ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या तीन महिन्यांत तूर आणि उडीद डाळीच्या दरात जवळजवळ 10% घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात 7% अधिक क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली असून, पिकाची स्थिती देखील उत्तम आहे : ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे
Posted On:
08 OCT 2024 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज भारतीय किरकोळ व्यापारी संघटना (RAI) आणि प्रमुख संघटित किरकोळ व्यापार साखळ्या यांची बैठक घेतली आणि प्रमुख डाळींच्या दराची स्थिती आणि कल यावर चर्चा केली. सणासुदीच्या काळात ही बैठक योग्य वेळी आणि महत्वाची आहे. यंदाच्या खरीप हंगामात डाळींचे पेरणी क्षेत्र आणि उपलब्धतेत वाढ झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांत बहुतांश डाळींच्या बाजार भावाचा कल घटता राहिल्याचे दिसून येत आहे.
ग्राहक व्यवहार सचिवांनी माहिती दिली की, देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तूर आणि उडीद डाळीचे दर गेल्या तीन महिन्यांत सरासरी 10% कमी झाले आहेत, पण किरकोळ दरात अशी घसरण दिसून आली नाही.
चणा डाळीच्या संदर्भात, गेल्या एक महिन्यात मोठ्या बाजारांमध्ये भावात सरासरी घट झाली, पण किरकोळ दर वाढत आहेत. डाळींच्या किरकोळ आणि घाऊक भावातील तफावत म्हणजे, किरकोळ विक्रेते बाजार भावातील चढ-उतारांचा गैरफायदा घेऊन अधिक नफा कमवत असल्याचे दर्शवत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाजारातील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, ही तफावत अधिक वाढताना आढळून आली, तर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे त्या म्हणाल्या.
डाळींच्या उपलब्धतेवर बोलताना ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी माहिती दिली की, खरीपातील उडीद आणि मूग डाळ बाजारात येऊ लागली आहे, तर देशांतर्गत उत्पादनाला पूरक म्हणून, पूर्व आफ्रिकी देश आणि म्यानमार मधून तूर आणि उडीद डाळीची आयात होत आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या साठा जाहीर करण्याच्या पोर्टलवर मोठ्या साखळी विक्रेत्यांद्वारे जाहीर करण्यात आलेल्या डाळींच्या साठ्याचे प्रमाण दर आठवड्याला वाढत आहे. यावरून देशातील डाळींची पुरेशी उपलब्धता स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात 7% अधिक क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली असून, पिकाची स्थिती देखील उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारातील डाळींची सध्याची उपलब्धता आणि मंडी मधल्या भावातील घसरण लक्षात घेता, किरकोळ उद्योगाने डाळींचे दर ग्राहकांना परवडण्याजोगे ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात, संघटित किरकोळ विक्री साखळ्यांनी भारत डाळ, विशेषत: भारत मसूर डाळ आणि भारत मूग डाळीच्या वितरणात एनसीसीएफ आणि नाफेडशी समन्वय साधावा, जेणे करून भारत डाळ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचेल, असे त्या म्हणाल्या.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063315)
Visitor Counter : 91