अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभागाने लडाख मधील हान्ले येथे एमएसीई या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि जगातल्या सर्वात उंच इमेजिंग चेरेन्कोव्ह दुर्बीणीचे केले उद्घाटन


एमएसीई प्रकल्पामुळे वैज्ञानिक संशोधनात प्रगती होत असून लडाखच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही मदत होत आहे : अणुउर्जा सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष,डॉ.ए.के.मोहंती

Posted On: 08 OCT 2024 6:32PM by PIB Mumbai

मुंबई, 8 ऑक्टोबर 2024


लडाख मधील हान्ले येथे 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रमुख वातावरणीय चेरेन्कोव्ह एक्सपिरीमेंट वेधशाळेचे उद्घाटन अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, डॉ. ए.के.मोहंती यांच्या हस्ते झाले. एमएसीई ही आशियातील सर्वात मोठी इमेजिंग चेरेन्कोव्ह दुर्बीण आहे. ती 4,300 मीटर उंचीवर स्थित असून हे जगातील अशाप्रकारचे सर्वोच्च उदाहरण आहे. ई सी आय एल  आणि इतर भारतीय उद्योग भागीदारांच्या सहयोगाने भाभा अणु संशोधन केंद्राने ही स्वदेशी दुर्बीण  निर्माण केली आहे.एमएसीई वेधशाळेचे उद्घाटन म्हणजे अणुऊर्जा विभागाच्या अमृत महोत्सवी वर्षातील प्रकल्पांचा एक भाग आहे.या कार्यक्रमाच्या आरंभी लडाख मधील हॅनले येथे डॉ.मोहंती यांच्या हस्ते स्मारक फलकांचे अनावरण करण्यात येऊन एमएसीईचे अधिकृत उद्‌घाटन करण्यात आले.

एमएसीई वेधशाळा ही भारतासाठी एक अतुलनीय कामगिरी असून कॉस्मिक-रे म्हणजेच अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणाऱ्या शक्तीशाली किरणांच्या जागतिक स्तरावरच्या  संशोधनात आपल्या देशाला आघाडीवर ठेवण्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प असल्याचे डॉ. मोहंती यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. या दुर्बिणीमुळे आपल्याला उच्च ऊर्जा असणाऱ्या गॅमा किरणांचा अभ्यास करता येईल ज्यामुळे विश्वात घडणाऱ्या विस्मयकारक घटनांबद्दल सखोल माहिती उपलब्ध होईल तसेच एमएसीई प्रकल्पामुळे वैज्ञानिक संशोधनात प्रगती होत असून लडाखच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही मदत होत आहे, असे ते म्हणाले. हा प्रकल्प भारतीय खगोलशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, असे सांगून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रात करिअर करण्यासाठी यामुळे  प्रोत्साहन मिळेल अशी आशा डॉ. मोहंती यांनी व्यक्त केली.

एमएसीई  दुर्बिणीचे उद्घाटन भारतीय खगोल भौतिकशास्त्र आणि वैश्विक-किरण संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 4,300 मीटर उंचीवर स्थित, असलेली एमएसीई दुर्बिण उच्च-ऊर्जा गॅमा किरणांचे निरीक्षण करेल,ज्यामुळे सुपरनोव्हा, कृष्ण विवर आणि गॅमा-रे स्फोटांसारख्या विश्वातील सर्वात ऊर्जावान घटना समजून घेण्याच्या जागतिक प्रयत्नांना हातभार लागेल. यामुळे जागतिक वेधशाळांनाही त्याचा लाभ होईल आणि मल्टी मेसेंजर खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे स्थान मजबूत होईल.

भविष्यात आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवणे, अंतराळ संशोधनात भारताचे योगदान वाढवणे आणि जागतिक वैज्ञानिक समुदायात भारताचे स्थान मजबूत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.भारतीय शास्त्रज्ञांच्या भावी पिढ्यांसाठी ही वेधशाळा दीपस्तंभ म्हणून काम करेल, ज्यामुळे त्यांना खगोल भौतिकशास्त्रातील नवीन पैलू आणि आयाम शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2063245) Visitor Counter : 71


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil