संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी भारताची परिकल्पना, शाश्वत विकास, आर्थिक वृद्धी आणि परस्पर संरक्षणाच्या माध्यमातून भागीदारी जोपासण्यावर आधारित आहे: हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवाद 2024 मध्ये संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन


भारताने नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेसाठी स्वीकारलेली भूमिका आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर यांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला पुनरुच्चार

“विवादांचे  शांततापूर्ण निराकरण आणि  हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्याला चालना देण्याची भारताची भूमिका 

Posted On: 04 OCT 2024 5:33PM by PIB Mumbai

 

हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी भारताची परिकल्पना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागर (क्षेत्रातील सर्वांसाठी संरक्षण आणि वृद्धी) संकल्पनेवर आधारित आहे आणि शाश्वत विकास, आर्थिक वृद्धी तसेच परस्पर संरक्षणाला प्राधान्य देणाऱ्या भागीदारीची जोपासना करण्यावर आमचा विश्वास आहे,” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. नवी दिल्ली येथे आज, दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवाद (आयपीआरडी) 2024 मध्ये ते बोलत होते.

नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर आणि ‘लॉ ऑफ द सी’ वरील संयुक्त राष्ट्र संमेलनात निहित तत्वांचे पालन ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची कोनशीला आहे असे सांगून राजनाथ सिंह यांनी या संकल्पनांच्या पालनाप्रती भारताच्या अढळ निर्धाराचा पुनरुच्चार केला. “भारताने नेहमीच विवादांच्या शांततापूर्ण निराकरणाची बाजू उचलून धरली असून क्षेत्रीय संवाद, स्थैर्य आणि सामुहिक विकासाची जोपासना करण्यात आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेवर अधिक भर देऊन हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्याला चालना देण्यात स्वारस्य दर्शवले आहे,” ते म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांची सुरक्षितता तसेच संरक्षण सुनिश्चित करण्याप्रती भारताची कटिबद्धता देखील अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, सामुहिक सागरी सुरक्षाविषयक आराखड्याला बळकटी देणे हा सेनादलांचे संयुक्त सराव तसेच माहितीच्या सामायीकीकरणासाठीच्या उपक्रमांसह इतर अनेक उपक्रमांमध्ये क्षेत्रीय भागीदार देशांसह घेतलेला सहभाग या कार्यक्रमांचा उद्देश आहे.

भारतीय सशस्त्र दले, विशेषतः भारतीय नौदल या परिसरातील देशांसोबत सहकारी तत्वावरील कार्यक्रम राबवण्यात नेहमीच आघाडीवर असते ही बाब अधोरेखित करत ते म्हणाले की स्वतःच्या क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी नौदल सतत प्रयत्नशील असते. “सागरी सहकार्यासाठीचे प्रयत्न सुरु ठेवतानाच भारताला इतर कोणत्याही देशाशी संघर्ष करण्यात स्वारस्य नाही,” त्यांनी सांगितले. 

सतत बदलते सामर्थ्य  आयाम, साधनसंपत्तीसाठीची स्पर्धा आणि नव्याने उदयाला येत असलेल्या सुरक्षाविषयक धोक्यांनी सध्याच्या वेगाने उत्क्रांत होत जाणाऱ्या जागतिक सागरी परिदृश्याला आकार दिला आहे याकडे संरक्षणमंत्र्यांनी निर्देश केला. ते पुढे म्हणाले की हिंद-प्रशांत मंचाच्या उदयातून दृश्य स्वरूपातील समतोल जागतिक सत्तेचे दर्शन घडते आहे. “हिंद-प्रशांत परिसर हा जगातील सर्वात चैतन्यमय भूराजकीय विभाग म्हणून उदयाला आला असून आर्थिक आणि धोरणात्मक स्वारस्यांचा गुरुत्वाकर्षण बिंदू बनला आहे. पूर्वीपासून अस्तित्वात असलेला आंतरराष्ट्रीय तणाव, चढाओढ आणि संघर्ष यांचा देखील या भागावर दबाव आहे. यातील काही आव्हाने स्थानिक स्वरुपाची तर अनेक आव्हानांचे स्वरूप जागतिक स्तरावर परिणाम करणारे आहे,” संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

धोरणात्मक कारणांसाठी महत्त्वाच्या स्त्रोतांवर मक्तेदारी मिळवण्याचे आणि शस्त्रांचा वापर करण्याचे होत असलेले प्रयत्न चिंता वाढवणारे असून अशा प्रकारच्या प्रवृत्ती जागतिक कल्याणासाठी हितकारक नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले.

आयपीआरडी हा भारतीय नौदलाचा वार्षिक शिखर स्तरावरील धोरणात्मक संवाद कार्यक्रम असून हिंद-प्रशांत सागरी उपक्रमाची (आयपीओआय) सात लक्ष्ये क्रमाक्रमाने पूर्ण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2062219) Visitor Counter : 21


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi