वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी न्यूयॉर्क येथे व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच उद्योजकांशी साधला संवाद


केंद्रीय मंत्री गोयल यांनी भारतातील गुंतवणूक, उत्पादन आणि व्यापार क्षेत्रातील संधींविषयी केली चर्चा

Posted On: 03 OCT 2024 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज न्यूयॉर्क येथे व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच भारतीय समुदायासोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या.

अमेरिका भेटीच्या दुसऱ्या दिवशी गोयल यांनी ब्लॅकरॉक कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी रॉबर्ट गोल्डस्टीन; सिस्टिम्स टेक्नोलॉजी समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनुप पोपट, टिलमन होल्डिंग्स कंपनीचे सीईओ संजीव आहुजा, सी4व्ही चे सीईओ शैलेश उप्रेती तसेच जॅनस हेंडरसन इन्व्हेस्टर्स कंपनीचे सीईओ अली दिबादी यांच्यासह अनेक प्रमुख गुंतवणूकदार कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताला जागतिक पातळीवरील उत्पादन केंद्राच्या रुपात स्थापित करण्याच्या दृष्टीने सहयोगाच्या संधींबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या बैठकीत उपस्थित  व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली आणि त्यांना भारतात त्यांच्या व्यवसायाचा आणि व्यापाराचा विस्तार करण्यासाठी आमंत्रित केले. भारतात व्यापार करण्यातील सुलभतेत वाढ करण्याच्या दृष्टीने आघाडीच्या व्यापार संस्थांतील तज्ञांनी महत्त्वाच्या सूचना आणि संकल्पना मांडाव्यात असे आवाहन देखील केंद्रीय मंत्र्यांनी केले.

माध्यम विश्वावर प्रचंड प्रभाव असेलल्या आणि या क्षेत्रासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या न्यूजवीक या कंपनीचे सीईओ असलेल्या देव प्रगाद या भारतीय वंशाच्या तरुण उद्योजकाशी देखील केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी संवाद साधला.

स्नेहभोजनाच्या वेळी अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या (युएसआयएसपीएफ) सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत गोयल यांनी व्यापार करण्यातील सुलभता, पायाभूत सुविधा विकास तसेच आयपीआर सुधारणा यांच्यात वाढ करण्याप्रती तसेच सुयोग्य अनुदान योजनांच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्राला प्राधान्य देण्याप्रती केंद्र सरकारच्या कटिबद्धतेवर अधिक भर दिला. नवोन्मेष, रोजगार निर्मिती आणि शाश्वत औद्योगिक विकास यांच्यावर लक्ष केंद्रित केलेल्या नव्या सरकारी धोरणांबाबत आशावादी असल्याचे गुंतवणूकदारांनी नमूद केले. 

दिवसभराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी स्थानिक भारतीय समुदाय, एक विना-नफा संस्था,तसेच भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेच्या (आयसीएआय) न्यूयॉर्क, न्यूजर्सी, फिलाडेल्फिया तसेच वॉशिंग्टन डी.सी. येथील कार्यालयांतील सदस्यांच्या भेटी घेऊन साधकबाधक चर्चा केली. या चर्चा मुख्यतः भारतीय समुदायाची जागतिक ताकद आणि भारताच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी हा समुदाय उपलब्ध करून देऊ शकत असलेल्या प्रचंड संधी यांच्यावर आधारित होत्या.

केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अमेरिका भेटीदरम्यान न्यूयॉर्क येथील भारतीय कौन्सुलेट जनरल (सीजीआय) यांच्यातर्फे न्यूयॉर्क येथील रत्ने तसेच जवाहिरे उद्योगांमध्ये कार्यरत महत्त्वाच्या व्यापार प्रमुखांशी गहन विचारविनिमयविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी जागतिक बाजारपेठेतील या क्षेत्रातील महत्त्वाचा देश म्हणून भारताचे सामर्थ्य अधोरेखित केले तसेच या क्षेत्राच्या वाढीला चालना देऊ शकणाऱ्या वाढीव सहयोग, गुंतवणूक आणि नवोन्मेष यांच्या क्षमतेवर अधिक भर दिला. सदर संवादाने दोन्ही देश्नातील बाजारपेठांच्या दरम्यान अधिक सशक्त संबंधांची जोपासना करण्याच्या तसेच परस्पर लाभ आणि विकासासाठीचे नवे मार्ग खुले करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2061529) Visitor Counter : 50