ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या गोदामांमध्ये आधुनिक दूरदृश्यप्रणालीआधारित देखरेख प्रणाली स्थापित केली
Posted On:
01 OCT 2024 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2024
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा एक भाग म्हणून, भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) त्यांच्या गोदामांमध्ये पाळत ठेवण्यासाठी असलेली सीसीटीव्ही यंत्रणा अधिक आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने सध्याच्या ॲनालॉग सीसीटीव्ही पाळत प्रणालीला आय पी-आधारित प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या 561गोदामांमध्ये सुमारे 23,750 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एफ एस डी श्यामनगर येथे भारतीय गुणवत्ता परिषद (क्यू सी आय )ने या संकल्पनेचे यश प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच आता ही सुधारणा करण्यात येणार आहे. या नवीन आय पी -आधारित प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग, सुधारित प्रमाण आणि रिमोट ऍक्सेस तंत्रज्ञानाद्वारे देखरेख क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल.
भारतीय अन्न महामंडळ अन्न धान्याची खरेदी , भंडारण आणि वितरण यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असून ते भारताच्या अन्नधान्य व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महामंडळाची ही कार्यनिपुणता देशाच्या अन्नसुरक्षेला चालना तर देतेच शिवाय कृषिविकासाला देखील प्रोत्साहन देते. महामंडळाच्या बहुविध कामांपैकी एक म्हणजे भंडारण. संपूर्ण देशात बफर स्टॉक अर्थात अन्नधान्याचा पुरेसा साठा सुनिश्चित करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेसाठी भंडारण महत्त्वपूर्ण आहे. देशभरात महामंडळाची 500 हून अधिक गोदाम असल्याने त्यावर सदैव काटेकोर पाळत ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये एफसीआय ने त्यांच्या विविध गोदामांमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 2013-14 मध्ये 61 गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, 2014-15 मध्ये त्यांची संख्या 67 पर्यंत वाढली आणि 2018 पर्यंत 446 गोदामांपर्यंत विस्तारली. सध्या 516 गोदामांमध्ये सीसीटीव्ही द्वारे पाळत ठेवण्यात येते. या कॅमेऱ्यांचे लाइव्ह वेब फीड एफसीआय वेबसाइटवर “See your depot” टॅबमध्ये उपलब्ध आहे.
पाळत ठेवण्याच्या या नवीन प्रणालीमध्ये स्थापन केलेले सीसीटीव्ही कॅमेरे कॅमेरा टेम्परिंग, कॅमेरा फील्ड ऑफ व्ह्यू चेंज, कॅमेरा ब्लर/आउट ऑफ फोकस, मोशन डिटेक्शन आणि ट्रिप वायर इत्यादी गोष्टींवर पाळत ठेवेल ज्यामुळे अपप्रकार झाल्यावर लगेच माहिती मिळू शकेल. नवीन प्रणालीमुळे एफसीआय च्या मुख्यालयात केंद्रीकृत कमांड नियंत्रण आणि नेटवर्क परिचालन केंद्र स्थापन करता येणार आहे.
मागणी किंवा आवश्यकता असल्यास आनुषंगिक डेटा संग्रहित करण्याची तरतूद असल्याने कमांड नियंत्रण केंद्राने स्थापन केलेल्या प्रणालीचे रक्षण करता येऊ शकेल. याशिवाय यामुळे प्रगत व्हिडिओ विश्लेषण आणि मजबूत सुरक्षा उपाय देखील योजता येतील ज्यामुळे एफसीआयला, त्यांच्या गोदामांमधील दैनंदिन कामकाजावरील प्रभावी देखरेख आणि व्यवस्थापन यामध्ये सहाय्य होईल.
प्रस्तावित प्रणालीमध्ये पर्यावरण आणि आर्द्रता सेन्सरचाही प्रायोगिक तत्त्वावर समावेश असेल, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता आणखी वाढेल. हे सेन्सर पर्यावरणीय परिस्थितीचे निरीक्षण करण्यात सक्षम असतील तसेच त्यांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यात प्रणालीच्या कार्यक्षमतेसाठी अनुकूल परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी बहुमोल माहिती अर्थात डेटा प्रदान करतील.
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
(Release ID: 2060947)
Visitor Counter : 56