संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाचा 92 वा वर्धापन दिन : संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथून 7,000 कि.मी.च्या ‘वायू वीर विजेता’ कार रॅलीला दिला हार्दिक निरोप
सशस्त्र दलात सामील होवून देशसेवा करावी, यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी कार रॅलीचे आयोजन - राजनाथ सिंह
Posted On:
01 OCT 2024 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2024
भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) 92 व्या वर्धापन दिनानिमित्त, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 01 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथून 'वायू वीर विजेता' कार रॅलीला हार्दिक निरोप दिला. या रॅलीमध्ये महिलांसह 50 हून अधिक हवाई योद्धे असून ते आज लडाखमधील थॉईसला जाण्यासाठी येथून रवाना झाले. लडाखनंतर हे हवाई वीर नऊ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 7,000 किलोमीटरची मोहीम पूर्ण करून अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे जाणार आहे. या रॅलीमध्ये माजी हवाईदल प्रमुखही वेगवेगळ्या टप्प्यांवर सहभागी होणार आहेत.
यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अतिशय कठीण परिस्थितीत शौर्य, समर्पण आणि देशभक्ती या भावनेने मातृभूमीची सेवा करीत असल्याबद्दल हवाई योद्ध्यांचे कौतुक केले. “आयएएफने देश आणि देशातील लोकांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. देशाच्या शत्रूंना त्यांच्या हद्दीत घुसून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास आपले सैनिक सक्षम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही भारतीय हवाई दलाला अत्याधुनिक विमाने/ ‘प्लॅटफॉर्म’सह सुसज्ज करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाद्वारे त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
अत्यंत खडतर आणि डोंगराळ भूप्रदेशातून मार्गक्रमण करणाऱ्या रॅलीतील हवाई योद्ध्यांना यावेळी राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. समुद्रसपाटीपासून 3,068 मीटर उंचीवर जगातील सर्वात उंच हवाई दल केंद्रांपैकी एक असलेल्या थॉईस येथे 8 ऑक्टोबर रोजी रॅलीला औपचारिक झेंडा दाखवला जाईल. त्यानंतर रॅलीचा प्रवास पुढे सुरू होईल. 29 ऑक्टोबर 2024 रोजी तवांगमध्ये रॅलीचा समारोप होणार आहे. या प्रवासात हवाई योद्धा लेह, कारगिल, श्रीनगर, जम्मू, चंदीगड, डेहराडून, आग्रा, लखनौ, गोरखपूर, दरभंगा, बागडोगरा, हसीमारा, गुवाहाटी, तेजपूर आणि दिरांग येथे थांबणार आहेत.
भारतीय हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. वेगवेगळ्या युद्धांमध्ये हवाई योद्ध्यांनी दाखवलेले शौर्य, त्यांनी केलेली साहसी कृत्ये आणि पार पाडलेल्या बचाव मोहिमा यांची माहिती देवून, तरुणांना मातृभूमीच्या सेवेसाठी प्रेरित करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, कार रॅली दरम्यान, हवाई योद्धे विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये युवावर्गाशी संवाद साधतील. या देवाणघेवाणीमुळे तरुणांची मने प्रज्वलित होतील, त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी आणि अभिमानाचे आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2060643)
Visitor Counter : 41