वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
दर्जेदार उत्पादनावर लक्ष केंद्रित करून ‘ब्रँड इंडिया’ला प्रोत्साहन देण्याचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे उद्योग क्षेत्राला आवाहन
‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा भाग म्हणून गोयल यांनी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) लाभार्थी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
Posted On:
29 SEP 2024 5:34PM by PIB Mumbai
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 140 हून अधिक उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) लाभार्थी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी (सीईओ) आज संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनात ‘झीरो इफेक्ट झीरो डिफेक्ट’ सूत्राने भारतीय उद्योगांनी दर्जेदार वस्तूंच्या उत्पादनावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करून ब्रँड इंडियाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पीएलआय लाभार्थी कंपन्यांच्या प्रयत्नांची पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. प्रमुख क्षेत्रांची वाढ, रोजगारनिर्मिती आणि भारताला उत्पादन क्षेत्रात महासत्ता म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी या कंपन्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे गोयल म्हणाले. या कंपन्यांचे समर्पण, नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करताना त्यांनी केलेली ठोस गुंतवणूक आणि पीएलआय योजनांद्वारे रोजगार निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले .
भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी उत्पादनांचे देशांतर्गत मूल्यवर्धन करण्यावर भर द्यावा आणि यासाठी उद्योगांनी देशांतर्गत उत्पादकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

तीन तास चाललेल्या संवादादरम्यान, लाभार्थी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पीएलआय योजनेविषयीची त्यांचा परिप्रेक्ष्य मांडला त्यांचे अनुभव सांगितले, यशोगाथा सांगितल्या. या योजना अधिक फलदायी होण्यासाठी त्यांची सूटसुटीत अंमलबजावणी कशी करता येईल याविषयी सूचना मांडल्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातील मुक्त संवादाचे हे एक फलदायी व्यासपीठ ठरले. व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी याविषयीचे कायदे अधिक खुले करता येतील का याबाबत गोयल यांनी उद्योग क्षेत्राची मते जाणून घेतली.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) च्या समन्वयाने अंमलबजावणी मंत्रालये/विभाग आणि संबंधित प्रकल्प व्यवस्थापन संस्था (पीएमए) यांच्या माध्यमातून उद्योजक आणि सरकार यांच्यातील संवाद सुरू ठेवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. भविष्यातील विकासासाठी धोरणाचे महत्त्व आणि सक्षम वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि परदेशी सहयोग सुलभ करण्यासाठी उद्योगातील भागधारक इन्व्हेस्ट इंडिया, नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन आणि फॅसिलिटेशन एजन्सीशी संपर्क साधू शकतात, असे ते म्हणाले.
अंमलबजावणी करणारे मंत्रालय/विभाग आणि प्रकल्प व्यवस्थापन एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. पीएलआय योजनेद्वारे 14 क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष झालेल्या परिणामांबाबत चर्चा करण्यात आली.
मन की बात
सर्व सहभागींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या 114 व्या भागाचे प्रसारण ऐकले ज्यामध्ये मेक इन इंडिया मोहिमेने भारताला एक उत्पादन महाशक्ती बनवण्यात कसे योगदान दिले याचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या मोहिमेमुळे इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, वस्त्रोद्योग, विमान वाहतूक, ऑटोमोबाईल्स या आणि इतर क्षेत्रातील निर्यात वाढीसह थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) सातत्याने वाढ होत आहे. देश आता "गुणवत्ता: जागतिक मानकांची उत्पादने" आणि "व्होकल फॉर लोकल : स्थानिक उत्पादनांचा प्रचार" यावर लक्ष केंद्रित करत आहे, या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला
पीएलआय प्रभाव
बैठकीदरम्यान पीएलआय योजनांच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2060147)