वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा आकार 2030 पर्यंत 350 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहचवण्यासाठीचा पथदर्शी कार्यक्रम तयार - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह


वर्ष 2030 पर्यंत 50 हजार मेट्रिक टन रेशीम लागवडीचे आणि त्यातून एक कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

Posted On: 27 SEP 2024 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा आकार वर्ष 2030 पर्यंत 350 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि त्यातून कोट्यवधी  रोजगार निर्माण होतील असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सुरुवातीच्या 100 दिवसांमधल्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कामगिरीविषयी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. तिसऱ्या काळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये मंत्रालयाने केलेल्या कामगिरीमुळे 2030 पर्यंत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याचा पाया रचला गेला आहे असे त्यांनी सांगितले.

रेशीम लागवडी अंतर्गत आपल्या मंत्रालयाने 2030  पर्यंत 50 हजार मेट्रिक टन उत्पादनाचे आणि त्यातून  एक कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. रेशीम लागवड ही शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीशी जोडलेली आहे असे ते म्हणाले. सद्यस्थितीत गुजरातमध्ये एरी रेशीम निर्मितीला चालना देण्यासाठीचा प्रकल्प सुरू केला आहे, लवकरच या प्रकल्पाचा विस्तार देशभर केला जाईल. याचा मोठा लाभ एरंडेल उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पीएम मित्र पार्क (प्रधानमंत्री वस्त्रोद्योग आणि पोषाखविषयक व्यापक एकात्मिक पार्क - Pradhan Mantri Mega Integrated Textile Region and Apparel Park)  योजनेच्या नियोजनाविषयीची माहितीही पत्रकारांना दिली. या योजनेअंतर्गत एकूण 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, यामुळे सुमारे 21 लाख रोजगार निर्माण होतील असे ते म्हणाले. 

देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने सहाय्यकारी ठरेल असे, भारत टेक्स हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे, यामुळे आपल्या देशाला फोर एस म्हणजेच style, scale, skill and sustainability अर्थात बाज, व्याप्ती, कौशल्य आणि शाश्वतता ही उद्दिष्टे गाठण्यातही मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वस्त्रोद्योग क्षेत्रात पोषाखांच्या नाविन्यपूर्ण संरेखनाचे महत्व मोठे असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी अधोरेखित  केली आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (National Institute of fashion Technology) ही वस्त्रोद्योग क्षेत्राचा कणा झाली असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले. अलिकडच्या काळात तांत्रिक वैशिष्ट्यांनी सज्ज कापडाचा (क्षमता, टिकाऊपणा, आग प्रतिकारक्षम, रासायने प्रतिकारक्षम, आर्द्रतेचे व्यवस्थापन ही आणि अशी वैशिष्ट्ये असलेले - technical textile) वापर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो, हे पाहता देशात अशा कपड्यांची निर्मिती करण्याच्या उद्योगाला प्रचंड वाव असल्याचे ते म्हणाले. या अनुषंगानेच आपल्या मंत्रालयाने 2030 पर्यंत अशा कापडांची निर्यात 10 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत घेऊन जाण्याचे लक्ष्य समोर ठेवले असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वस्त्रोद्योगा अंतर्गतच्या हातमाग आणि हस्तकारागिरी उद्योगाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. यासाठीच्या उपक्रमाअंतर्गत देशभरातील एक कोटी हातमाग आणि हस्तकारागिरांना परस्परांशी  जोडले आहे, आणि या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हस्तकौशल्य ग्राम उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली

 

* * *

S.Kakade/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059611) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi