श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्र सरकारने कामगारांच्या किमान वेतन दरांमध्ये केली वाढ
Posted On:
26 SEP 2024 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2024
कामगारांना, विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कामगारांना राहणीमानाच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने ही वाढ करण्यात आली आहे.
इमारत बांधकाम, माल चढवणे आणि उतरवणे, चौकीदार किंवा पहारेकरी, केर काढणे, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि कृषीसह विविध क्षेत्रांमध्ये कामगारांना सुधारित वेतन दरांचा लाभ मिळेल. नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. वेतनदरांमध्ये शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती.
किमान वेतन दरांचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण केले जाते -अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि सर्वाधिक कुशल-तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार-ए, बी आणि सी.
सुधारणेनंतर, अकुशल कामासाठी उदा. बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, माल चढवणे आणि उतरवणे या क्षेत्रातील कामगारांसाठी ए श्रेणीत किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (मासिक 20,358 रुपये) अर्ध-कुशल 868 रुपये प्रतिदिन (मासिक 22,568 रुपये) असतील. याशिवाय कुशल, कारकुनी आणि विना शस्त्र चौकीदार किंवा पहारेकरीसाठी दिवसाला 954 रुपये (24,804 रुपये प्रति महिना) आणि अत्यंत कुशल आणि शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या चौकीदार किंवा पहारेकऱ्यासाठी 1,035 रुपये प्रतिदिन (26,910 रुपये) वेतन दर आहे.
औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून प्रभावीपणे परिवर्तनीय महागाई भत्तामध्ये सुधारणा करते.
केंद्र सरकारच्या मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या संकेतस्थळावर (clc.gov.in) कार्य , श्रेणी आणि क्षेत्रानुसार किमान वेतन दरांबाबत तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2059275)
Visitor Counter : 423