माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत बनला आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश, आशिया पॉवर इंडेक्समध्ये जपानला टाकले मागे

Posted On: 25 SEP 2024 10:33AM by PIB Mumbai

एका मोठ्या बदलाअंतर्गत , जपानला मागे टाकून भारत आशिया पॉवर इंडेक्समध्ये तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनला आहे, जी त्याची  वाढती  भू-राजकीय पत प्रतिबिंबित करते. ही कामगिरी भारताची गतिशील  वाढ, युवा  लोकसंख्या आणि विस्तारणारी अर्थव्यवस्था याने  प्रेरित असून  या क्षेत्रामध्ये एक अग्रणी  शक्ती म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे.
2024 आशिया पॉवर इंडेक्समधील सर्वात महत्वपूर्ण  निष्कर्षांपैकी एक म्हणजे प्रादेशिक शक्ती क्रमवारीत भारताची सातत्याने वाढ होत आहे . क्रमाक्रमाने  होत  असलेल्या या वाढीसह , भारत आपली पूर्ण क्षमता साध्य करण्याचा आणि या प्रदेशात आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे.


भारताच्या उदयामागील प्रमुख घटक:

1. आर्थिक विकास : भारताने महामारीनंतर उल्लेखनीय आर्थिक प्रगती करून दाखवली आहे, ज्यामुळे त्याच्या आर्थिक क्षमतेत 4.2 अंकांची वाढ झाली आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या आणि मजबूत जीडीपी वाढीने पीपीपी बाबतीत जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून त्याची स्थिती मजबूत केली आहे.

2. भविष्यातील संधी : भारताच्या भविष्यातील संसाधनांच्या गुणांमध्ये 8.2 अंकांनी वाढ झाली आहे , जो संभाव्य लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा संकेत आहे. आपल्या प्रादेशिक स्पर्धकांच्या विशेषत: चीन आणि जपानच्या तुलनेत भारताला युवा  लोकसंख्येचा फायदा होतो जो आगामी दशकांमध्ये आर्थिक वाढ आणि श्रमशक्तीच्या विस्ताराला गती  देईल.

3. राजनैतिक प्रभाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. भारताच्या अलिप्तवादी  धोरणात्मक स्थितीमुळे  नवी दिल्लीला जटिल आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात प्रभावीपणे मार्ग काढता आला आहे. 2023 मध्ये राजनैतिक संवादांच्या बाबतीत भारत 6 व्या क्रमांकावर होता, ज्यातून बहुपक्षीय मंचांवरील त्याचा सक्रिय सहभाग दिसून येतो.

याशिवाय ,भारताची मोठी लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता यासाठी पुरेशा संधी निर्माण करतात. सांस्कृतिक प्रभावामध्ये भारताचे गुण तुलनेने मजबूत आहेत ज्याला त्याच्या जागतिक समुदाय  आणि सांस्कृतिक आदानप्रदानातून  समर्थन मिळत आहे.

याशिवाय, बहुपक्षीय मुत्सद्देगिरी आणि सुरक्षा सहकार्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. संवादांमध्ये भारताचा सहभाग, तसेच क्वाड मध्ये त्याच्या नेतृत्वाने,  प्रादेशिक सुरक्षेच्या गतिशीलतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी  दिली आहे, भले औपचारिक लष्करी आघाडीच्या बाहेर राहूनच हे झाले आहे. भारताची आर्थिक व्याप्ती  मर्यादित असली तरी, विशेषतः संरक्षण क्षेत्रातील विक्रीत चांगली सुधारणा झाली आहे. फिलीपिन्ससोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार हे याचे उदाहरण आहे. जरी  या घडामोडी, छोट्या प्रमाणामध्ये असल्या तरी  त्या सूचित करतात की भारताने त्याच्या निकटच्या शेजाऱ्यांपेक्षा  अधिक  आपली भू-राजकीय ताकद वाढवायला सुरुवात केली आहे.

आशियातील भारताची भूमिका
2024 आशिया पॉवर इंडेक्स भारताला आशियातील एक शक्ती म्हणून प्रदर्शित करतो.  देशाचा पुरेसा  संसाधन साठा भविष्यातील वाढीसाठी अपार  क्षमता देतो. भारताचा दृष्टीकोन आशावादी आहे. सातत्यपूर्ण  आर्थिक विकास आणि वाढत्या कार्यबळाच्या जोरावर  भारत आगामी काळात आपला प्रभाव वाढवण्यासाठी सुस्थितीत आहे. विशेषतः, भारताचा वाढता राजनैतिक  प्रभाव आणि त्याची धोरणात्मक स्वायत्तता त्याला  हिंद-प्रशांत क्षेत्रातील एक प्रमुख देश बनवते.

आशिया पॉवर इंडेक्स
लोवी इन्स्टिट्यूटने 2018 मध्ये सुरु केलेला  आशिया पॉवर इंडेक्स, आशिया-प्रशांत  प्रदेशातील पॉवर डायनॅमिक्सचे वार्षिक मोजमाप आहे. हे आशिया-प्रशांत क्षेत्रातील 27 देशांचे मूल्यमापन करते, त्यांच्या बाह्य वातावरणाला आकार देण्याची आणि त्याला प्रतिसाद देण्याची क्षमता तपासते. 2024 ची आवृत्ती या क्षेत्रातील आजपर्यंतच्या पॉवर वितरणाचे सर्वात व्यापक मूल्यांकन सादर करते. तिमोर-लेस्टेचा प्रथमच यात समावेश करण्यात आला आहे, ज्यातून आग्नेय आशियातील त्याचे वाढते महत्त्व दिसून येते. हा  निर्देशांक राज्यांच्या भौतिक क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा प्रभाव या दोन्हींवर लक्ष केंद्रित करतो.

शक्ती मोजमापाचे निकष आणि मापदंड

आशिया पॉवर इंडेक्समधील शक्ती संसाधन-आधारित आणि प्रभाव-आधारित निर्धारकांमध्ये विभागली आहे:

1. संसाधन-आधारित निर्धारक:

आर्थिक क्षमता: कोणत्याही देशाची मुख्य आर्थिक ताकद, क्रयशक्ती समता (पीपीपी ) वरील जीडीपी , तांत्रिक अत्याधुनिकता आणि जागतिक आर्थिक कनेक्टिव्हिटी यासारख्या निर्देशकांद्वारे मोजली जाते.
सैन्य  क्षमता: संरक्षण खर्च, सशस्त्र सेना, शस्त्रास्त्र प्रणाली आणि लांब पल्ल्यापर्यंत  प्रक्षेपण सारख्या विशिष्ट  क्षमतांच्या आधारे  पारंपारिक लष्करी सामर्थ्याचे मूल्यांकन केले जाते.
लवचिकता: संस्थात्मक मजबूती, भू-राजकीय सुरक्षा आणि संसाधन सुरक्षितता यासह देशाच्या सुरक्षेला असलेले  धोके रोखण्याची अंतर्गत क्षमता.
भविष्यातील संसाधने: 2035 साठी अंदाजित आर्थिक, लष्करी आणि लोकसंख्याशास्त्रीय घटकांसह संसाधनांच्या भविष्यातील वितरणाचा अंदाज लावणे.

 

2. प्रभाव-आधारित निर्धारक:

आर्थिक संबंध: व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून लाभ  उठवण्याची क्षमता.
संरक्षण नेटवर्क: आघाड्या आणि भागीदारीची ताकद, लष्करी सहकार्य आणि शस्त्रास्त्र हस्तांतरणाद्वारे मोजली जाते.
राजनैतिक प्रभाव: कुठल्याही देशाची राजनैतिक पोहोच, बहुपक्षीय मंचांमध्ये सहभाग आणि परराष्ट्र धोरण महत्त्वाकांक्षा यांची तीव्रता .
सांस्कृतिक प्रभाव: सांस्कृतिक निर्यात, माध्यमे आणि लोकांमधील संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय जनमताला आकार देण्याची क्षमता.


कुठल्याही देशाचा एकूण पॉवर स्कोअर या आठ उपायांच्या भारित सरासरीवरून काढला जातो, ज्यामध्ये 131 वैयक्तिक निर्देशक असतात. याचे निष्कर्ष  आशिया-प्रशांत क्षेत्रात  देश आपल्या संसाधनांचे प्रभावामध्ये कसे रूपांतर करतात याची सूक्ष्म ओळख करून  देतात.

संदर्भ:
https://power.lowyinstitute.org/downloads/lowy-institute-2024-asia-power-index-key-findings-report.pdf

***

NM/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2058883) Visitor Counter : 31