शिक्षण मंत्रालय
तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावलीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, शिक्षण मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना केल्या जारी
Posted On:
21 SEP 2024 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
तरुणांमधील तंबाखू सेवनाच्या व्यसनाशी लढा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुख्य सचिवांना संबोधित करणाऱ्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (सीओटीपीए) 2003 च्या तरतुदींनुसार, शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखू-मुक्त शैक्षणिक संस्था (टीओएफईआय) नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संयुक्त मार्गदर्शक सूचना, तंबाखूच्या सेवनाचे, विशेषत: लहान मुलांवर आणि किशोरवयीन मुलांवर होणारे भयानक परिणाम अधोरेखित करते. या सूचना जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण (जीवायटीएस) 2019 च्या निष्कर्षांकडे लक्ष वेधून घेतात, ज्यामध्ये भारतातील 13 ते 15 वयोगटातील 8.5% शालेय विद्यार्थी विविध स्वरूपात तंबाखूचे सेवन करत असल्याचे दिसून आले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे भारतातील 5,500 पेक्षा जास्त मुले दररोज तंबाखू सेवनाला सुरुवात करतात. शिवाय, जन्मभर तंबाखूचे सेवन करणाऱ्या 55% लोक वयाची 20 वर्षे पूर्ण होण्याआधीच ही सवय लावून घेतात, परिणामी अनेक किशोरवयीन मुले इतर अंमली पदार्थांच्या सेवनाकडेही वळतात.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा (एनटीसीपी) भाग म्हणून भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, तंबाखू आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या वापरापासून अल्पवयीन आणि तरुणांचे संरक्षण करण्यासाठी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था (टीओएफईआय) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. याशिवाय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास सोसायटी (सीडस्) च्या सहकार्याने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (डब्ल्युएनटीडी) शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखू-मुक्त शैक्षणिक संस्था (टीओएफईआय) अंमलबजावणी नियमावली विकसित केली आणि तिच्या अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे.
विभागाने 31 मे 2024 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अनुपालनासाठी नियमावली जारी केली. नियमावलीत खालील उद्दिष्टे समाविष्ट आहेत:
- शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि अधिकारी यांच्यामध्ये तंबाखूच्या वापराचे हानिकारक परिणाम आणि त्याचे आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल अधिक जागरूकता;
- तंबाखू सेवनाचा त्याग करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मार्गांबद्दल जागरूकता;
- शैक्षणिक संस्थांमध्ये निरोगी आणि तंबाखूमुक्त वातावरण तसेच सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हायला हव्यात ; आणि
- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि वापर, यांच्याशी संबंधित कायदेशीर तरतुदींची उत्तम अंमलबजावणी, विशेषत: शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, वैधानिक इशारे आणि अल्पवयीन मुले यांच्याशी संबंधित कायदेशीर तरतुदींची उत्तम अंमलबजावणी.
टीओएफईआय नियमावली वाचण्यासाठी युआरएल:
https://dsel.education.gov.in/sites/default/files/update/im_tofel.pdf
टीओएफईआय मार्गदर्शक तत्त्वे वाचण्यासाठी युआरएल:
https://ntcp.mohfw.gov.in/assets/document/TEFI-Guidelines.pdf
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057429)
Visitor Counter : 54