राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

कंपनीतील कामाच्या ताणामुळे केरळमधील एका सनदी लेखापाल मुलीचा पुणे येथे मृत्यू झाल्या प्रकरणाची एनएचआरसी ने स्वतःहून घेतली दखल

Posted On: 21 SEP 2024 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

महाराष्ट्रात पुणे येथे 20 जुलै 2024 रोजी कामाच्या अतिभारामुळे केरळमधील एका 26 वर्षीय सनदी लेखापाल मुलीचा मृत्यू झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची दखल  राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) ने स्वत:हून घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी ती अर्न्स्ट अँड यंग कंपनीत रुजू झाली होती. तिच्या आईने नियोक्त्याला पत्र लिहून दावा केला आहे की उशिरापर्यंत काम केल्यामुळे तिच्या मुलीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे, मात्र कंपनीने हा आरोप फेटाळला आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत आहे.

आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की माध्यमातील वृत्त जर खरे असेल तर युवा वर्गाला कामाच्या ठिकाणी भेडसावणारी आव्हाने, मानसिक तणाव, चिंता आणि झोप न लागणे, अव्यवहार्य लक्ष्यांचा पाठलाग करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम यामुळे गंभीर समस्या उद्भवत आहेत. आणि कालांतराने त्यांच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होते. आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित, संरक्षित आणि सकारात्मक वातावरण प्रदान करणे हे प्रत्येक नियोक्त्याचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाने आणि निष्पक्षतेने वागवले जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

व्यवसायांनी मानवी हक्कांच्या मुद्द्यांसाठी जबाबदारी घेतली पाहिजे आणि जागतिक मानवी हक्क मानकांशी संरेखन सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे कार्य आणि रोजगार धोरणे आणि नियम नियमितपणे अद्ययावत आणि दुरुस्त केले पाहिजेत, यावर आयोगाने भर दिला.

त्यानुसार त्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणातील तपासाचा परिणाम देखील आयोगाला जाणून घ्यायचा आहे. याशिवाय, आयोगाला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत आणि उचलली जाणार आहेत हे देखील जाणून घ्यायचे आहे. चार आठवड्यांमध्ये हा अहवाल अपेक्षित आहे.

18 सप्टेंबर 2024 रोजी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या आईने दावा केला आहे की तिच्या मुलीचा मृत्यू मोठ्या कार्यसंस्कृतीचे प्रतिबिंब आहे, जे कठोर परिश्रमाचा आदर करते परंतु आरोग्याची किंमत मोजावी लागते. मूल्ये आणि मानवी हक्कांबाबत बोलणारी कंपनी आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी देखील उपस्थित राहू शकत नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

 

* * *

M.Pange/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057414) Visitor Counter : 61


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu