संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला उंचावरच्या ठिकाणांवरील वास्तव्याच्या दृष्टीने अत्यावश्यक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण
Posted On:
21 SEP 2024 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अंतर्गत येणाऱ्या शरीरशास्त्र आणि संलग्न विज्ञानविषयक संरक्षण संस्था (The Defence Institute of Physiology and Allied Sciences - DIPAS) या अग्रगण्य प्रयोगशाळेने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला (PGCIL) उंचावरच्या ठिकाणांवरील वास्तव्याच्या दृष्टीने अत्यावश्यक तंत्रज्ञान हस्तांतरित केले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या जम्मू येथील प्रादेशिक मुख्यालयात दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी अभिमुखता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ही हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. लडाखमधील 5000 मेगावॅट क्षमतेच्या पांग - कैथल हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट (HVDC) प्रकल्पाच्या अनुषंगाने तिथल्या कर्मचाऱ्यांना उंच ठिकाणांवरील मोहीमांसाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पांग - कैथल हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट (HVDC) हा प्रकल्प लडाखमध्ये 15,760 फूट उंचीवर उभारलेला आहे. हा प्रकल्प म्हणजे लडाखच्या प्रदेशातील ऊर्जा सुरक्षा आणि भारताच्या राष्ट्रीय विद्युत पुरवठा साखळीत सौर ऊर्जेचे व्यापक स्वरुपात एकात्मिकीकरण घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता शरीरशास्त्र आणि संलग्न विज्ञानविषयक संरक्षण संस्थेने (DIPAS) हस्तांतरित केलेले तंत्रज्ञान पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना लडाखमधील या सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या प्रकल्पासाठी काम करण्यात मदतीचे ठरणार आहे.
याआधी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात उंच ठिकाणांवरचे विगमन आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याविषयीच्या तांत्रिक ज्ञानाच्या देवाण घेवाणीविषयीचा सामंजस्य करार झाला होता. तर शरीरशास्त्र आणि संलग्न विज्ञानविषयक संरक्षण संस्था ही उंचावरील ठिकाणांशी संबंधीत संशोधनात केलेल्या पायाभूत कामांसाठी नावाजलेली संस्था आहे. या संस्थेने याआधी हिमालयीन प्रदेशात भारतीय लष्करासाठी अनुकूल मानके तयार केली आहेत. या प्रयोगशाळेने उंचावरील ठिकाणांवर अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पौष्टिक खाद्यान्न साठ्याचे प्रमाण, संरक्षणात्मक कपडे, अपारंपारिक ऊर्जा - आधारित निवारा तसेच थंडी - अशा परिस्थितील दुखापती प्रतिबंधक मलम यांसारख्या अनेक उपाययोजना विकसित केलेल्या आहेत.
शरीरशास्त्र आणि संलग्न विज्ञानविषयक संरक्षण संस्थेचे संचालक डॉ. राजीव वार्ष्णेय यांनी यावेळी झालेल्या कार्यशाळेच्या प्रारंभिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांच्यासोबत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या पांग-कैथल एचव्हीडीसी प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक अमित शर्मा (स्वतंत्र प्रभार) हे देखील उपस्थित होते. या कार्यशाळेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि शरीरशास्त्र आणि संलग्न विज्ञानविषयक संरक्षण संस्थेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
शरीरशास्त्र आणि संलग्न विज्ञानविषयक संरक्षण संस्था तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने राष्ट्रीय हिताच्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी परस्परांसोबत सहकार्यविषयक भागिदारी केल्याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी या दोन्ही संस्थांच्या पथकांचे अभिनंदनही केले.
* * *
M.Pange/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057339)
Visitor Counter : 37