वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लाओ पीडीआर येथे 21 व्या आसियान-भारत आर्थिक मंत्र्यांच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषविले

Posted On: 20 SEP 2024 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या व्हिएंटियान, लाओ पीडीआर भेटीच्या पहिल्या दिवशी, लाओ पीडीआरचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री मलाथॉन्ग कोमासिथ यांच्यासह, 21 व्या आसियान (ASEAN)-भारत आर्थिक मंत्र्यांच्या  बैठकीचे सह अध्यक्षपद भूषविले. सर्व, म्हणजेच ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या 10 आसियान देशांतील, आर्थिक मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. तिमोर-लेस्टे हा देश या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित होता.

मंत्र्यांनी भारत आणि आसियान यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा आढावा घेतला आणि हे संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

भारत आणि आसियानने 2023-24 मध्ये 120.9 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार नोंदवला असून, भारताच्या जागतिक व्यापारात असियानचा वाटा 10.9% इतका आहे.

मंत्र्यांनी विशेषतः आसियान-भारत वस्तू व्यापार कराराच्या (AITIGA) पुनरावलोकनासाठीच्या  वाटाघाटीमधील प्रगतीची नोंद घेतली. केंद्रीय मंत्री पीयूष  गोयल यांनी यावेळी सध्याचे एफटीए (परदेश व्यापार करार) आणि पुनरावलोकनादरम्यान सीमा शुल्कातील असमान उदारीकरणामुळे उद्योगांची झालेली हानी दूर करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी एफटीएद्वारे इतर अर्थव्यवस्थांशी जोडण्याकरता भारताच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला, आणि आसियान-भारत वस्तू व्यापार करारात (AITIGA) श्रेणी सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला.

पुनरावलोकनाचे परिणाम परस्पर हिताचे आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण असतील, तसेच आसियान-भारत वस्तू व्यापार करार (AITIGA) अधिक प्रभावी, वापरकर्ता-अनुकूल, सुलभ आणि व्यवसायांसाठी व्यापार-सुलभ बनवला जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा मंत्र्यांनी  पुनरुच्चार केला.

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2057235) Visitor Counter : 25


Read this release in: English , Urdu , Hindi