आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे आयोजित विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या यंदाच्या दुसऱ्या जागतिक खाद्य नियामक शिखर परिषदेचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते उद्‌घाटन


आंतरराष्ट्रीय व्यापार, उदयोन्मुख अन्न उत्पादन प्रक्रिया आणि उपभोगाच्या पद्धतीमधील बदल लक्षात घेऊन मानके विकसित करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत एफएसएसएआय ने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक

ग्राहक संरक्षण आणि पर्यावरणीय शाश्वतता हे दुहेरी प्राधान्यक्रम, धोरणांमध्ये प्रतिबिंबित होतील याची खबरदारी घेऊन खाद्य नियामक, संशोधन संस्था आणि ग्राहक व्यवहार विभागातील आमचे सहयोगी प्रयत्न नवोन्मेषाला चालना देतील : प्रल्हाद जोशी

Posted On: 20 SEP 2024 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम मध्ये यंदाच्या दुसऱ्या जागतिक खाद्य नियामक शिखर परिषदेचे उद्‌घाटन केले. केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री व  नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे आयोजित विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहयोगातून या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. संपूर्ण अन्न मूल्य साखळीत अन्न सुरक्षा प्रणाली आणि नियामक चौकट बळकट करण्यात विचारमंथनासाठी खाद्य नियमकांना जागतिक मंच प्रस्थापित करण्याचे याचे उद्दिष्ट आहे.

जगाला शाश्वततेसाठी प्रयत्न करताना खाद्यजन्य आजार, पोषण सुरक्षा, नवनवीन खाद्यपदार्थ आणि सूक्ष्म प्लास्टिक यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने खाद्य नियामकांचे वाढते महत्त्व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.खाद्य नियामकांची भूमिका कधीही अधिक महत्त्वाची ठरली नाही आणि त्यासाठी सतत सहकार्य, अथक नवकल्पना आणि अन्न सुरक्षा प्रणालींमध्ये सतत सुधारणा करण्याची बांधिलकी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय व्यापार, उदयोन्मुख अन्न उत्पादन प्रक्रिया आणि उपभोगाच्या पद्धतीमधील बदल लक्षात घेऊन मानके विकसित करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत एफएसएसएआय ने केलेल्या प्रयत्नांचे नड्डा यांनी कौतुक केले. “18 मार्च 2023 रोजी आपल्या माननीय पंतप्रधानांनी जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेत उदघाटन केलेल्या भरडधान्य  मानकांचा विकास ही एक उल्लेखनीय कामगिरी होती” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अन्न सुरक्षा मानके आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्याचे काम चालू आहे याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अवगत केले. "यामध्ये एएमआर 2.0 वर राष्ट्रीय कृती योजना विकसित करणे आणि कीटकनाशकांसाठी कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) कोडेक्स मानकांसह संरेखित करणे, जागतिक व्यापारात आपले स्थान सुधारणे समाविष्ट आहे" अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावरील नियमनाची चौकट सखोल समजून घेण्यासाठी आणि खाद्य उत्पादनांच्या सुरक्षेविषयी माहितीच्या आदानप्रदानाला चालना देण्यासाठी आपल्याला जीएफआरएस 2024 मुळे विस्तारित मंच उपलब्ध झाला आहे.

एफएसएसएआयने सलग दुसऱ्या वर्षी अशा जागतिक शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल प्रल्हाद जोशी यांनी प्रशंसा केली. अन्न सुरक्षेविषयी जागतिक पातळीवर संवादाचे महत्त्व अधोरेखित करून जोशी म्हणाले, “ ग्राहक संरक्षण आणि पर्यावरणीय शाश्वतता हे दुहेरी प्राधान्यक्रम, धोरणांमध्ये प्रतिबिंबित होतील याची खबरदारी घेऊन खाद्य नियामक, संशोधन संस्था आणि ग्राहक व्यवहार विभागातील आमचे सहयोगी प्रयत्न नवोन्मेषाला चालना देतील .”

आरोग्यपूर्ण राष्ट्राच्या उभारणीमध्ये अन्नाचा दर्जा व अन्न सुरक्षेला महत्त्व असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “नियमनाचे निकष ठरवणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. जनतेपर्यंत पोहोचणारे अन्न सुरक्षित असल्याची खात्री करण्यात एफएसएसएआय आणि आमच्या विभागाची महत्त्वाची भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटना – डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲडहॅनॉम घेब्रेयसस यांनी दूरदृश्य माध्यमातून सहभागींना संबोधित केले. हवामान बदलामुळे आपल्या अन्न व्यवस्थेसमोर विविध आव्हाने निर्माण झाली आहेत याकडे लक्ष वेधून घेत, जागतिक स्तरावर नियामक धोरणांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राष्ट्रीय अन्न नियमन महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

अन्न सुरक्षा व्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या हेतूने विविध नवोन्मेषी उपक्रमांना सुरुवात झाली असून त्याविषयी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. या उपक्रमांमध्ये अन्न आयात नाकारल्याच्या सूचने (फूड इम्पोर्ट रिजेक्शन अलर्ट – एफआयआरए) चा समावेश आहे. हे ऑनलाईन पोर्टल असून भारताच्या सीमांवर अन्नाची आयात नाकारण्यात आल्यास त्याची सूचना जनता व संबंधित अन्न सुरक्षा प्राधिकरणांना देण्याची प्रणाली त्यावर आहे.

शिखर परिषदेत अन्न आयात मंजुरी प्रणाली 2.0 (एफआयसीएस 2.0) साठी नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. ही या प्रणालीची सुधारित आवृत्ती असून वेगवान प्रक्रिया आणि पारदर्शकता आणून यापूर्वीच्या आवृत्तीच्या मर्यादा दूर करण्याच्या हेतूने ही विकसित करण्यात आली आहे. त्यात ऑटोमेशन, नवे पर्याय आणि इतर संबंधित पोर्टलसह एकात्मिकरणाचा समावेश आहे.

भरडधान्य पाककृती कार्यक्रम ‘फ्लेवर्स ऑफ श्री अन्न – सेहत और स्वाद के संग’ ही 13 भागांची मालिका दूरदर्शनवर सुरू करण्यात आली आहे. भरडधान्याच्या पाककृतींचा प्रचारप्रसार हे या मालिकेचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे पोषणविषयक जागरूकतेला चालना मिळेल आणि वैविध्यपूर्ण भरडधान्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यामुळे आरोग्याला मिळणाऱ्या  फायद्यांकडे लक्ष वेधून घेता येईल.

राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक – एसएफएसआय 2024 या वार्षिक अहवालाचे प्रकाशन हे उद्घाटनाच्या सत्रात लक्षवेधी ठरले. भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची अन्न सुरक्षेबाबत कामगिरीचे मूल्यांकन या अहवालात मांडले असून निर्देशांकाच्या क्रमवारीत केरळ, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, गुजरात आणि नागालँड उच्च स्थानी आहेत.

S.Kakade/V.Joshi/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2057104) Visitor Counter : 34