वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल 20-21 सप्टेंबर 2024 रोजी लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या व्हिएनतियानेला देणार भेट.
21व्या आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या बैठकीत आणि 12व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत पीयूष गोयल होणार सहभागी.
Posted On:
20 SEP 2024 10:39AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल 20-21 सप्टेंबर 2024 रोजी लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या व्हिएनतियानेला भेट देणार असून ते 21व्या आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या बैठकीत आणि 12व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. आसियान देशांच्या या वार्षिक बैठकांचं आयोजन यावर्षी आसियानचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकने आपल्या संवाद भागीदारांसमवेत केले आहे.
पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत 10 आसियान देशांचे अर्थमंत्री आणि पूर्व आशिया शिखर परिषदेच्या भारत, अमेरिका, रशिया, चीन, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 8 भागीदार देशांचे अर्थमंत्री सहभागी होणार आहेत.
आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झालेले मंत्री आसियान भारत मालव्यापार करारासंबधित (AITIGA) वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतील. या वाटाघाटी अधिक सुलभ, संबंधितांसाठी अनुकूल आणि व्यापाराला अधिकाधिक चालनादायी ठरण्याच्या दृष्टीकोनातून या आढाव्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत क्षेत्रीय आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर विचारविनिमय होईल. भारत हा पूर्व आशिया शिखर परिषदेचा संस्थापक सदस्य असून या परिषदेला पुढील वर्षी दोन दशके पूर्ण होत आहेत.
या दोन संस्थात्मक बैठकांच्या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी देशांच्या मंत्र्यांशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. या परिषदेचे यजमानपद भूषवणाऱ्या लाओ पीडीआरचे मंत्री आणि कोरिया, मलेशिया, स्वित्झर्लंड आणि म्यानमारच्या मंत्र्यांसोबत देखील ते बैठका होणार आहेत. याशिवाय ते आसियानचे महासचिव आणि आशिया आणि प्रशांतक्षेत्रासाठीची प्रमुख संशोधन संस्था, ईआरआयए या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्ष्यांसमवेत बैठक घेणार आहेत. गोयल आपल्या दौऱ्यात लाओ पीडीआर येथील भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून आसियान आणि भारतातून आलेल्या उद्योगजगतातील प्रतिनिधिमंडळाला देखील भेटणार आहेत.
भारत 1992 मध्ये आसियान मध्ये सामील झाला आणि 2022 मध्ये त्याचा सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार बनला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये जाहीर केल्यानुसार आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. आसियान हा भारताच्या सर्वात महत्त्वाच्या व्यापार भागीदारांपैकी एक असून गेल्या सलग दोन वर्षांपासून आसियान हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
***
NilimaC/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2056944)
Visitor Counter : 63