विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन आणि विकासाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाची बायो राईड योजनेला मंजुरी

Posted On: 18 SEP 2024 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान विभागाच्या दोन योजनांचे विलीनीकरण करून ‘जैवतंत्रज्ञान संशोधन नवकल्पना आणि उद्योजकता विकास (बायो-राइड)’ या योजनेला जैव-उत्पादन आणि जैव-प्रक्रिया या नवीन घटकांसह मंजुरी दिली.

या योजनेत तीन व्यापक घटक आहेत:

  1. जैवतंत्रज्ञान संशोधन आणि विकास (R&D);
  2. औद्योगिक आणि उद्योजकता विकास (I&ED)
  3. जैव-उत्पादन आणि जैव-प्रक्रिया

2021-22 ते 2025-26 या 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत ‘बायो-राइड’ या एकीकृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी 9,197 कोटी रुपये इतका प्रस्तावित खर्च आहे.

जैव-उत्पादन आणि जैव-प्रक्रिया या क्षेत्रात जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देऊन जैव उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बायो-राइड योजना आखण्यात आली आहे. या संशोधनाला गती देणे, उत्पादन क्षेत्रात विकासाला पाठिंबा देणे आणि शेक्षणिक संशोधन आणि उद्योगांमधील त्याचा प्रत्यक्ष वापर यातील तफावत दूर करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ही योजना म्हणजे आरोग्यसेवा, कृषी, पर्यावरणीय शाश्वतता आणि शुद्ध ऊर्जा यांसारख्या राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील आव्हानांना तोंड देण्यासाठी जैव-नवोन्मेषाची क्षमतावृद्धी करण्याच्या भारत सरकारच्या मोहिमेचा एक भाग आहे.

बायो-राइड योजनेची अंमलबजावणी :

  • जैव-उद्योजकतेला प्रोत्साहन : बायो-राइड योजना बियाणे निधी, इनक्युबेशनसाठी सहाय्य आणि जैव-उद्योजकांना मार्गदर्शन याद्वारे स्टार्ट-अप्ससाठी एक समृद्ध जैवसंस्था निर्माण करेल.
  • प्रगत नवोन्मेष : ही योजना सिंथेटिक जीवशास्त्र , जैविक वैद्यकीय उत्पादन, जैव ऊर्जा आणि  जैविक प्लास्टिक यांसारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन आणि विकासासाठी अनुदान आणि प्रोत्साहन देईल.
  • उद्योग - शैक्षणिक संस्था यांच्यात सहयोग प्रस्थापित करणे : जैव आधारित उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाला गती देण्यासाठी बायो-राइड योजना शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योगक्षेत्रात समन्वय वाढवण्यावर भर देईल.
  • शाश्वत जैवउत्पादनाला प्रोत्साहन : भारताच्या हरित उद्दिष्टांशी संलग्न असलेल्या जैव उत्पादन क्षेत्रातील पर्यावरणीय शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर महत्त्वपूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल.
  • बाह्य संशोधन निधीद्वारे संशोधकांना आर्थिक पाठबळ : बायो-राइड योजना कृषी, आरोग्यसेवा, जैव ऊर्जा आणि पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांमध्ये संशोधन संस्था, विद्यापीठे आणि वैयक्तिक संशोधकांना बाह्य संशोधन निधीद्वारे आर्थिक पाठबळ देऊन जैव तंत्रज्ञान शाखेतील विविध क्षेत्रांमधील प्रगत शास्त्रीय संशोधननवोन्मेष आणि तांत्रिक विकास यांना चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावेल.
  • जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मनुष्यबळाला पाठिंबा : जैवतंत्रज्ञानात बहुविद्याशाखीय क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थीयुवा संशोधक आणि शास्त्रज्ञांना पाठबळ देऊन बायो राइड योजना सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच मनुष्यबळ विकासाचा हा एकीकृत कार्यक्रम क्षमता बांधणी आणि मनुष्यबळाला कौशल्य प्रदान करून त्यांना प्रगत तांत्रिक युगाच्या नवीन क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी कार्यक्षम करेल.

याशिवाय,या योजनेत वर्तुळाकार-जैव-अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक पैलूत हरित आणि अनुकूल पर्यावरणीय उपायांचा समावेश करून जागतिक हवामान बदल विषयक समस्या कमी करण्यास चालना देण्याच्या उद्देशाने लाईफ(LiFE) अर्थात पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या उपक्रमाशी सुसंगत जैव-उत्पादन आणि जैव-प्रक्रिया हे घटक अंतर्भूत केले आहेत. बायो-राइड योजनेचे नवे घटक आरोग्यसेवा क्षेत्रात उत्तम परिणाम साध्य करण्यासहकृषी उत्पादकता वाढवण्यासाठी, जैव-अर्थव्यवस्थेची वाढ, जैव-आधारित उत्पादनांचा स्तर वाढवणे, भारतातील अत्यंत कुशल कामगारांच्या समूहाचा विस्तार करणे , उद्योजकीय गती वाढवणे आणि व्यापारीकरण करण्यासाठी स्वदेशी नाविन्यपूर्ण उपायांचा विकास सुलभ करण्यासाठी 'जैवनिर्मिती' ची अफाट क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने कार्य करतील.

जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रयत्न जैवतंत्रज्ञान संशोधन, नाविन्य, भाषांतर, उद्योजकता, आणि औद्योगिक वाढ आणि भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय विकास आणि समाजाच्या कल्याणासाठी एक अचूक साधन म्हणून जैवतंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाशी संलग्न आहेत. वर्ष 2030 पर्यंत जैव अर्थव्यवस्थेची उलाढाल 300 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत पोहचेल. बायो-राइड योजना 'विकसित  भारत 2047' चे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.

पार्श्वभूमी :

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेला जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक जीवशास्त्रातील उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्ण शोध संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देतो.

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2056216) Visitor Counter : 74