अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयाच्या भांडवली खर्चाचा आढावा घेणारी दुसरी बैठक आज नवी दिल्लीत संपन्न
निर्मला सीतारामन यांनी नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ यावर लक्ष केंद्रित करणे केले अधोरेखित, तसेच सध्याच्या रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण,विद्युतीकरण यासह क्षमता वाढ, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी कामाला गती देण्यासाठी केल्या सूचना
Posted On:
17 SEP 2024 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय भांडवली खर्चाचा (कॅपेक्स)आढावा घेणारी बैठक झाली.
ही बैठक केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण कॅपेक्स खर्चासह मंत्रालये आणि विभागांसोबत नियोजित केलेल्या आढावा बैठकांच्या मालिकेचा एक भाग होती.
रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या भांडवली खर्चाच्या योजना आणि प्रगतीची माहिती दिली.
नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ देण्यावर सरकारचे लक्ष अधोरेखित करत , निर्मला सीतारामन यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या कॅपेक्स परिव्ययानुसार सध्याच्या रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि देशभरात नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासह क्षमता वाढ, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
मालवाहतूक कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि रेल्वे वाहतुकीशी संबंधित लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी, प्रधानमंत्री गति शक्ती अंतर्गत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या तीन आर्थिक रेल्वे कॉरिडॉर कार्यक्रमांसाठी 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :
- ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर,
- बंदर संपर्क सुविधा कॉरिडॉर आणि
- उच्च घनतेची रहदारी कॉरिडॉर
सुमारे 11.16 लाख कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणूक योजनेसह एकूण 40,900 किमी लांबीच्या तीन आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत 434 रेल्वे प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी निर्मला सीतारामन यांना दिली. ते पुढील प्रमाणे आहेत :
- ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर (192 प्रकल्प),
- उच्च घनता नेटवर्क कॉरिडॉर (200 प्रकल्प), आणि
- रेल सागर प्रकल्प (42 प्रकल्प)
या कॉरिडॉर अंतर्गत आतापर्यंत 1.03 लाख कोटी रुपये गुंतवणूक योजनेचे एकूण 5,723 किलोमीटर लांबीचे 55 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. चालू वर्षात, कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत 101 प्रकल्पांचे मूल्यांकन केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कवच प्रणाली (भारताची स्वदेशात निर्मित स्वयंचलित रेल्वे संरक्षण (एटीपी) प्रणाली) टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यास आणि नेमून दिलेले कॅपेक्स लक्ष्य निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यास सांगितले.
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा आणि सोई वाढवण्यासाठी - अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषित केल्याप्रमाणे 40,000 सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये जलद रूपांतर केले पाहिजे,असेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055834)
Visitor Counter : 61