आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते जागतिक अन्न नियामक शिखर परिषद 2024 चा लोगो आणि माहितीपत्रकाचे प्रकाशन

Posted On: 17 SEP 2024 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज निर्माण भवन येथे ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट (GFRS), अर्थात जागतिक अन्न नियामक परिषद 2024 चा  लोगो आणि माहितीपत्रकाचे प्रकाशन केले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2024 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारत मंडपम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान ही परिषद आयोजित केली आहे.

जागतिक स्तरावर अन्न सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना, केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की,  की, आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकाळापासून अन्नसुरक्षेवर लक्ष केंद्रित केले जात असताना, जगभरातील लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षेलाही समान प्राधान्य द्यायला हवे.

ते म्हणाले की, ही परिषद अन्न नियामकांचे जागतिक व्यासपीठ तयार करेल, ज्या ठिकाणी अन्न मूल्य साखळीतील अन्न सुरक्षा प्रणाली आणि नियामक चौकट मजबूत करण्यासाठी दृष्टीकोनांची देवाणघेवाण होईल.  

केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी भविष्यातील धोके, तांत्रिक प्रगती आणि ग्राहकांच्या बदलत्या मागण्या, यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि नियामक परिसंस्थेत सातत्त्याने नव्या गोष्टी आत्मसात करण्याच्या गरजेवर भर दिला, आणि जागतिक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ज्ञानाची देवाण करण्यावर भर दिला.

“30 आंतरराष्ट्रीय संस्था आणि 70 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही दुसरी जागतिक अन्न नियामक परिषद असून, यामध्ये अन्न सुरक्षा नियामक आणि जोखीम मूल्यांकन प्राधिकरणे, संशोधन संस्था आणि विद्यापीठांचा समावेश आहे. या परिषदेत सुमारे 5,000 प्रतिनिधी प्रत्यक्षपणे, तर सुमारे 1.5 लाख लोक दूरस्थ पद्धतीने सहभागी होतील. आपण सहकार्याची रणनीती आणि माध्यमांवर चर्चा करणार आहोत. नियामकांच्या प्रमुख समस्यांवरही  चर्चा होईल”, ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, ही परिषद अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, अनुपालनाबाबतची  समज विकसित करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धतींचे आदान प्रदान करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इतर देशांबरोबर समन्वय निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरेल.

पोषणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी भरड धान्यांवर आधारित पाककृतींचा प्रचार करणाऱ्या दूरदर्शनवरील 13 भागांच्या  ‘फ्लेवर्स ऑफ श्री अन्न- सेहत और स्वाद के संग’, या कार्यक्रमाचा शुभारंभ  या कार्यक्रमात होईल.

भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या  राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक (SFSI) 2024 चा प्रारंभ , व्यवसाय सुलभतेला चालना देणे, पौष्टिक खाद्यपदार्थांची उपलब्धता वाढवणे आणि अन्न सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा,  या मुद्द्यांवरील वरिष्ठ सरकारी अधिका-यांसह प्रमुख खाद्य कंपन्यांच्या सीईओंची परिषद, आणि भूतान, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरच्या द्विपक्षीय बैठका, ही या परिषदेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.


N.Chitale/R.Agashe/P.Malandkar  

 


(Release ID: 2055828) Visitor Counter : 81


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu