संरक्षण मंत्रालय

तिसरी इंडस-एक्स शिखर परिषद कॅलिफोर्नियात संपन्न


संरक्षण विषयक अभिनव उपक्रमात सहकार्य वाढवण्यासाठी आयडेक्स आणि संरक्षण नवोन्मेष युनिट दरम्यान सामंजस्य करार

Posted On: 13 SEP 2024 9:42AM by PIB Mumbai

 

तिसरी इंडस-एक्स शिखर परिषद अमेरिकेत संपन्न झाली. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या संयुक्त संरक्षण नवोन्मेषिक परिसंस्थेच्या वाटचालीतील प्रगतीचे ते द्योतक होते. 9-10 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंच (युएसआयएसपीएफ) आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेली ही शिखर परिषद म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम होता.

या शिखर परिषदेदरम्यान, संरक्षण विषयक नावीन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आणि उद्योग, संशोधन आणि गुंतवणूक भागीदारी सुलभ करण्यात सहयोग वाढवण्यासाठी आयडेक्स आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागांतर्गत असलेल्या संरक्षण नवोन्मेष युनिट (डीआययु) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शिखर परिषदेच्या अन्य प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंडस-एक्स अंतर्गत नवीन आव्हानाची घोषणा, इंडस-एक्स प्रभाव अहवालाचे प्रकाशन आणि आयडेक्स आणि डीआययु संकेतस्थळावर अधिकृत इंडस-एक्स वेबपृष्ठाचे अनावरण यांचा समावेश होता.

ही शिखर परिषद स्टार्टअप्स/एमएसएमई द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संयुक्त प्रदर्शनासाठी एक मंच प्रदान करते. इंडस-एक्स अंतर्गत वरिष्ठ सल्लागार गट आणि वरिष्ठ धुरिण मंच या दोन सल्लागार मंचांद्वारे महत्वपूर्ण विचारमंथन देखील ही परिषद सक्षम करते. इतर गोष्टींबरोबरच, भविष्यातील तंत्रज्ञानाचा कल, स्टार्टअप्सची क्षमता बांधणी, संरक्षण नवकल्पनांसाठी निधीची संधी आणि संरक्षण पुरवठा साखळी मजबूत करण्यावर यावेळी चर्चा झाली. उभय देशांतील संरक्षण उद्योग, गुंतवणूक संस्था, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, विचारवंत, प्रवेगक, धोरणकर्ते इत्यादी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी चर्चासत्रात भाग घेतला.

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे सहसचिव (संरक्षण उद्योग प्रोत्साहन) अमित सतीजा म्हणाले की, तिसऱ्या इंडस-एक्स शिखर परिषदेने नावीन्यपूर्ण आणि धोरणात्मक सहकार्याद्वारे संरक्षण तंत्रज्ञानात प्रगती करण्याच्या दोन्ही देशांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागांतर्गत (डिओडी) अंतर्गत संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण नवोन्मेष युनिट (डीआययु) च्या वतीने इंडस-एक्स उपक्रम इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडेक्स) अर्थात संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष द्वारे चालविला जात आहे. जून 2023 मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीदरम्यान इंडस-एक्स ची सुरुवात झाल्यापासून, हा उपक्रम अल्पावधीतच महत्त्वपूर्ण टप्पे गाठण्यात यशस्वी झाला आहे.

***

S.Pophlale/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2054462) Visitor Counter : 18