विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्लोबल बायो इंडियाने भविष्यातील जैवतंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा करत 30 स्टार्टअप्सचा प्रारंभ केला : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह


विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चौथ्या ग्लोबल बायो इंडिया 2024 चे केले उद्घाटन

Posted On: 12 SEP 2024 8:56PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024

ग्लोबल बायो इंडिया परिषदेने भविष्यातील जैवतंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा करत 30 स्टार्टअप्सचा प्रारंभ केला असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंह  यांनी आज प्रगती मैदान येथे आयोजित चौथ्या ग्लोबल बायो इंडिया 2024 च्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह, यांनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय वृद्धीबद्दल जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद ( बीआयआरएसी )यांचे अभिनंदन केले. भारताच्या जैव अर्थव्यवस्थेने 2014 मधील 10 अब्ज अमेरिकी डॉलर्स पासून 2024 मध्ये 130 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक  इतकी उसळी घेतली असून 2030 पर्यंत ही उलाढाल 300 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, असे ते ग्लोबल बायो इंडिया परिषदेला संबोधित करताना म्हणाले.

भारत आता एक जागतिक जैवतंत्रज्ञान ऊर्जाकेंद्र म्हणून उदयास येत असताना अर्थव्यस्थेला चालना देणाऱ्या, नाविन्यपूर्ण कल्पना, नोकऱ्या आणि पर्यावरणीय वचनबद्धतेशी एकनिष्ठ असलेल्या जगभरातील जैवतंत्रज्ञान क्रांतीचे चॅम्पियन  म्हणून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात स्वागत केले जाईल, असे ते म्हणाले.  

डॉ. जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेने तयार केलेल्या भारतातील जैवतंत्रज्ञान उद्योगाच्या अभूतपूर्व प्रगतीचा वेध घेणाऱ्या "भारत जैव अर्थव्यवस्था अहवाल 2024" चा आपल्या भाषणात उल्लेख केला. जैवतंत्रज्ञान परिवर्तनाच्या या नव्या युगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक आणि दूरदर्शी नेतृत्वाचे त्यांनी कौतुक केले.

ग्लोबल बायो इंडिया परिषदेचे महत्व विशद करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की ग्लोबल बायो इंडिया परिषद केंद्र आणि राज्य सरकारची मंत्रालये, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, मोठे उद्योग, जैवसमूह, संशोधन संस्था, गुंतवणूकदार, इन्क्युबेटर्स, नियामक, धोरणकर्ते, व्यवसाय विश्लेषक, कायदेशीर, बौद्धिक संपदा (आयपी), क्लिनिकल संशोधन संस्था (सीआरओ), इतर देशांतील नावीन्यपूर्ण मिशन,आंतरराष्ट्रीय संस्था, उद्योग संघटना या सर्वांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण संपर्क साधणारा व्यावसायिक मंच प्रदान  करते”.

जागतिक हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करतेवेळी शुद्ध, हरित आणि समृद्ध भारताची निर्मिती करताना बायोइकॉनॉमी धोरणाचा आरंभ एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर अगदी योग्य वेळी झाल्याचे डॉ सिंह  यांनी बायो ई 3 योजनेच्या तपशीलांविषयी बोलताना सांगितले. हे नवीन धोरण पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेत देखील महत्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जैव-आधारित रसायने आणि विकरे (एन्झाईम्स); स्मार्ट प्रथिने; अचूक जैव उपचारपद्धती हवामान अनुकूल शेती; कार्बन कॅप्चर आणि त्याचा वापर; भविष्यकालीन सागरी आणि अवकाश संशोधन या मुख्य प्राधान्यक्षेत्रांचा त्यांनी पुनरुच्चार केला. यामुळे जैवतंत्रज्ञानाचे भविष्य आणि विविध उद्योगांमध्ये वाढ आणि नवोन्मेषला चालना मिळेल असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

विशेषत: टियर-II आणि टियर-III शहरांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सिंह  यांनी भर दिला. ही जैव उत्पादन केंद्रे स्थानिक संसाधनांचा वापर करून प्रादेशिक स्तरावर आर्थिक विकासाला हातभार लावतील तसेच सर्वसमावेशक वाढीलाही चालना देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उच्च ध्येयासक्ती ठेवा, मार्गातील अडथळे दूर करा आणि नवनवीन शिखरे गाठा, असे डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले. आपण प्राप्त केलेली गती आणि टॅलेंट इंडिया@ 2047 यांच्या सहयोगाने आपण जैवतंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करू, असे त्यांनी सांगितले.

जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेने (बीआयआरएसी )ने जैवतंत्रज्ञान क्षेत्रामधील 9 आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत इरादा पत्रावर स्वाक्षरी केली.

ग्लोबल बायो इंडिया 2024 परिषदेत बीआयआरएसी कंपेंडियम ऑफ प्रॉडक्ट्स अँड टेक्नॉलॉजीज 2024 सोबत भारतीय जैव अर्थव्यवस्था अहवाल 2024 चे अनावरण  करण्यात आले. या व्यतिरिक्त या कार्यक्रमात बीआयआरएसी इक्विटी फंड आणि अमृत ग्रँड चॅलेंज JanCARE नवोन्मेष अहवाल आणि ग्लोबल बायो इंडिया एक्झिबिटर डिरेक्टरीचे प्रकाशन  देखील झाले.


N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2054357) Visitor Counter : 116


Read this release in: English , Tamil , Hindi