नौवहन मंत्रालय
धोरणात्मक सागरी विकास आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी किनारी राज्य विकास परिषदेची 20वी बैठक
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली 20व्या एमएसडीसीमध्ये सागरमाला,राष्ट्रीय जलमार्ग आणि बंदर कनेक्टीव्हिटी विषयी होणार महत्त्वपूर्ण चर्चा
Posted On:
12 SEP 2024 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
केंद्रीय बंदरे,जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुरगाव बंदराला भेट देऊन आगामी आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलची पाहणी केली.नव्या स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाची त्यांनी नौकेतून फेरी मारली आणि बंदरातील अत्याधुनिक सुविधांचा अनुभव घेतला. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी या बंदराच्या आवारात वृक्षारोपण केले.
तसेच, त्यांनी प्रसारमाध्यमांना उद्या गोव्यात होणार असलेल्या किनारी राज्य विकास परिषद - एमएसडीसीच्या 20व्या बैठकीविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्रीय बंदरे, जहाजे व जलमार्ग मंत्रालयाने भारताच्या सागरी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गोव्यात सागरमाला अंतर्गत 24,000 कोटी रुपयांचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. सागरी क्षेत्र इंडिया व्हिजन 2030 आणि अमृत काळ व्हिजन 2047 सह या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा किनारी राज्य विकास परिषद घेईल. किनारी राज्यांमधील सर्व भागीदारांना एकत्र आणून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा या मंत्रालयाचा उद्देश आहे. ”
“नव्या क्रुझ टर्मिनलसह मुरगाव बंदरात अतिउत्कृष्टतेचा सर्वोच्च टप्पा गाठण्यास आपण सज्ज आहोत. 2030 पर्यंत 1.5 दशलक्ष समुद्रपर्यटक संख्येचे ध्येय गाठण्यासाठी विविध सुविधा पुरवण्याचे आपले उद्दीष्ट आहे,” असे सोनोवाल यांनी पुढे सांगितले.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात ही बैठक होणार आहे.किनारी राज्यांचे मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक बैठकीला उपस्थित राहतील.
भारतीय सागरी क्षेत्राच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध उपक्रमांबाबत 20व्या एमएसडीसीत चर्चा होईल. चर्चेचा भर बंदर-केंद्रीत विकासासाठी सागरमाला कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा आणि भविष्यातील आखणीवर राहील. गुजरात मधल्या लोथल इथे राष्ट्रीय सागरी क्षेत्र वारसा संकुल (एनएमएचसी) द्वारे भारताच्या सागरी क्षेत्राचा संपन्न इतिहास जपण्यासाठी व त्याच्या प्रदर्शनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत धोरणात्मक चर्चा होईल. देशाच्या जलमार्गांचा विकास हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेसाठी घेतला जाणार असून माल आणि प्रवासी वाहतुकीला गती देण्याबाबत प्रस्तावांचे मूल्यांकन बैठकीत होईल.
तसेच, बंदरांपासून पुढे जमिनीवर माल व प्रवासी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्ते आणि रेल्वेचे जाळे सुधारण्याबाबत चर्चा होईल. राज्यांच्या नेतृत्वाखालील नवोन्मेषी उपक्रम यावेळी प्रदर्शित केले जातील. पर्यावरणीय शाश्वतता या मुख्य संकल्पनेशी संबंधित उपक्रम जसे की गोवा बंदरातील प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रदुषणाला कारणीभूत मालाची हाताळणी करण्याला आळा, बंदराचे कार्यान्वयन स्वच्छ व अधिक शाश्वत करण्याला प्रोत्साहन आणि गोव्याची पर्यटक व स्थानिक या दोहोंमध्ये असलेली प्रतिमा उंचावण्याविषयी बाबींवर चर्चा होईल.
या निर्णायक बैठकीमुळे सरकारची भारतीय सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवणे, बंदर कनेक्टीव्हिटी व सागरी क्षेत्रात सातत्यपूर्ण विकास साध्य करण्याप्रती वचनबद्धता पुन्हा अधोरेखित होत आहे. लहान बंदरांचे मोठ्या बंदरांसह एकात्मिकरण, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गांचे नवे प्रस्ताव, सागरी क्षेत्राची अर्थव्यवस्था भक्कम करण्यास मदत करेल.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054290)
Visitor Counter : 59