संरक्षण मंत्रालय
मनिला येथे भारत-फिलिपीन्स संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची 5 वी बैठक संपन्न
संरक्षण सचिवांनी फिलिपीन्स भारतीय संरक्षण उद्योगासोबत उपकरणांच्या सह-विकास आणि सह-निर्मितीत भागीदारीसाठी केले आमंत्रित
Posted On:
11 SEP 2024 6:03PM by PIB Mumbai
भारत- फिलिपीन्स संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची पाचवी बैठक 11 सप्टेंबर 2024 रोजी मनिला येथे पार पडली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि त्यांचे समकक्ष फिलिपीन्स च्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ उपसचिव इरिनेओ क्रूझ एस्पिनो यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
बैठकीदरम्यान, दोन्ही देशांनी द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. सह-अध्यक्षांनी 10 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या विविध सेवांमधील तिसऱ्या संवादाच्या निष्कर्षांचा आढावा घेतला आणि सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्यामध्ये वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी फिलिपीन्स सरकारच्या सेल्फ रिलायन्स डिफेन्स पोस्चर कायद्याची संरक्षण सचिवांनी प्रशंसा केली. भारतानेही ‘आत्मनिर्भर भारत’साठी असाच दृष्टिकोन मांडल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या दृष्टिकोनाअंतर्गत, भारतीय संरक्षण उद्योग सातत्याने आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे आणि जगभरात उपकरणे निर्यात करत आहे असे ते म्हणाले.
संरक्षण सचिवांनी उपकरणांच्या सह-विकास आणि सह-निर्मितीत भारतीय संरक्षण उद्योगासोबत भागीदारी करण्यासाठी फिलिपीन्सला आमंत्रित केले. फिलिपीन्सने देखील खात्रीशीर पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी दीर्घकालीन इक्विटी भागीदारीमध्ये गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे. संरक्षण उद्योग स्वदेशीकरणाच्या भारताच्या कार्यप्रणालीची आणि सिद्ध प्रमाणभूत ढाच्याची त्यांनी दाखल घेतली आणि प्रशंसा केली.
दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकमेकांना मदत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. नजीकच्या काळात मनिला येथील भारतीय दूतावासात व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्स्चेंज आणि संरक्षण विभाग सुरू होणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या दौऱ्यात संरक्षण सचिवांनी फिलिपीन्सचे राष्ट्रीय संरक्षण सचिव (फिलिपीन्सचे संरक्षण मंत्री) गिल्बर्ट एडुआर्डो गेरार्डो कोजुआंगको तेओडोरो ज्युनियर यांचीही भेट घेतली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, फिलिपीन्सच्या सशस्त्र दलाच्या मुख्यालयात त्यांचे मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053854)
Visitor Counter : 53