वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अपेडा कडून मुंबईहून मेलबर्नला भारतीय डाळिंबाची पहिली खेप पाठवण्याची सुविधा प्रदान

Posted On: 05 SEP 2024 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024

कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य  उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) ने 31 ऑगस्ट 2024 रोजी  भारतीय डाळिंबाची पहिली खेप मुंबईहून ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली.

ही यशस्वी निर्यात जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करण्याच्या भारताच्या क्षमता केवळ अधोरेखित करत नाही तर महसुलाचे नवे मार्ग खुले करून भारतीय शेतकऱ्यांना मोठे प्रोत्साहनही देते. मेलबर्नमध्ये ही खेप यशस्वीरीत्या पोहचली असून फाइन फूड ऑस्ट्रेलिया 2024 मधील अपेडा इंडिया पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. भारतीय डाळिंबांचे जागतिक आकर्षण यातून ठळकपणे अधोरेखित करत आहे.

ऑस्ट्रेलियाने 2020 मध्ये भारतीय डाळिंबांना बाजारपेठेत प्रवेश दिला, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना नवीन आणि किफायतशीर बाजारपेठेचा लाभ घेण्याचा  मार्ग प्रशस्त  झाला. ऑस्ट्रेलियाला डाळिंबाच्या निर्यातीसाठी एक कृती  योजना आणि मानक कार्यप्रणालीवर फेब्रुवारी 2024 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली , ज्यामुळे निर्यात प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित झाली.

भारत, बागायती पिकांचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश असून  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने अपेडाने विशेषत: डाळिंबासाठी निर्यात प्रोत्साहन मंचाची (ईपीएफ) स्थापना केली आहे. या  ईपीएफ मंचांमध्ये वाणिज्य विभाग, कृषी विभाग, राज्य सरकारे, राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळा आणि आघाडीच्या दहा प्रमुख निर्यातदारांचा समावेश असून डाळिंब निर्यातीला चालना देण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्न सुनिश्चित करतात.

मुंबईतील फळे आणि भाज्यांचे आघाडीचे  निर्यातदार आणि अपेडाचे  नोंदणीकृत निर्यातदार मे. के. बी. एक्सपोर्टस यांनी  ही खेप पाठवली होती. या खेपेतील डाळिंबे थेट मे.के. बी. एक्सपोर्टस यांच्या शेतातून आणण्यात आली होती .  या निर्यातीचे फायदे तळागाळातील भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील याची खातरजमा यातून होते. हे डाळिंब त्यांच्या अहमदनगरमधील ऑस्ट्रेलिया-मान्यताप्राप्त पॅकहाऊसमध्ये काळजीपूर्वक पॅक करण्यात आले होते, त्यामुळे ते  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक कठोर  गुणवत्ता मानकांची पूर्तता करणारे आहेत. 1.1 मेट्रिक टन  वजनाच्या या खेपेत 336 खोके (प्रत्येक 3.5 किलो वजनाचे) होते. ठरलेल्या कृती योजनेनुसार, वाशी, नवी मुंबई येथील MSAMB IFC येथे त्यावर आवश्यक विकिरण प्रक्रिया करण्यात आली.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2052294) Visitor Counter : 59


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi