कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फ्रान्समधील वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशन 2024 मध्ये आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी भारताचे पथक सज्ज

Posted On: 31 AUG 2024 7:05PM by PIB Mumbai

 

फ्रान्समधील ल्योन येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशन 2024 मध्ये भारत आपली युवा प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत 60 भारतीय स्पर्धक 61 कौशल्यांमध्ये 70 देशांमधल्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करणार आहेत. वर्ल्डस्किल्स स्पर्धा ही द्वैवार्षिक कौशल्य स्पर्धा असून, ती आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांचे ऑलिंपिक मानली जाते.

52 पेक्षा जास्त वर्ल्डस्किल्स तज्ञ, तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील 100 पेक्षा जास्त तज्ञांनी भारताच्या पथकाला प्रशिक्षित करण्यात आणि सुसज्ज करण्यात मदत केली आहे. ल्योन मधील वर्ल्डस्किल्स कॉम्पिटिशन मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात मोठ्या गटामध्ये भारताचा समावेश आहे.

या स्पर्धेत विविध क्षेत्रांतील कौशल्यांतील उत्कृष्टता प्रदर्शित केली जाते, ज्यामध्ये बांधकाम, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आणि सर्जनशील कला यांचा समावेश आहे. 23 वर्षांखालील स्पर्धक कठोर चाचण्यांमध्ये सहभागी होतात, ज्यामध्ये आधुनिक उद्योग मानकांची पूर्तता करणारे काम करावे लागते. या निमित्ताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांना भारतात आमंत्रित करण्यात आले आणि स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय अनुभव आणि कठोर प्रशिक्षणासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रिया, थायलंड, दुबई आणि स्वित्झर्लंड अशा देशांमध्ये पाठवले गेले.

भारताचे पथक 1 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पोहोचेल आणि अंतिम टप्प्याचे प्रशिक्षण घेईल. या प्रशिक्षणांमध्ये योग सत्रे, मानसिक सामर्थ्य सुधारण्यासाठी मानसिक चाचण्या, आहार सल्ला आणि मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

हे उमेदवार 6 सप्टेंबरला ल्योनला जाण्यासाठी रवाना होतील, त्यापूर्वी 3 सप्टेंबरला कौशल भवन येथे त्यांच्या सन्मानार्थ एक समारंभ आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या औपचारिक पोशाखाचे अनावरण करण्यात येईल. भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत चौधरी वर्ल्डस्किल्स कॉम्पिटिशन 2024 साठी रवाना होणाऱ्या या पथकाला निरोप देतील.

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

O

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050508) Visitor Counter : 61


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi