संरक्षण मंत्रालय
गोव्यात संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाच्या 'समुद्र प्रताप’ या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण
संरक्षण उत्पादनात देश पूर्णपणे आत्मनिर्भर व्हायला हवा : संरक्षण राज्यमंत्री
Posted On:
29 AUG 2024 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2024
देशातील संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्ण होण्यासाठीच नव्हे तर निर्यातदार बनण्यासाठी देखील काम करण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी संरक्षण उद्योग क्षेत्रातील भागीदारांना केले.
गोव्यात 29 ऑगस्ट 2024 रोजी स्वदेशी बनावटीच्या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाच्या (समुद्र प्रताप) जलावतरण प्रसंगी ते बोलत होते. हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) ने भारतीय तटरक्षक दलासाठी तयार केले आहे. देशाच्या सागरी किनारपट्टीवर तेलाची गळती रोखण्यासाठी हे जहाज मदत करेल. संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत नीता सेठ यांनी जहाजाचे जलावतरण केले आणि त्याचे 'समुद्र प्रताप' असे नामकरण केले.
संरक्षण राज्य मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. संरक्षण विषयक गरजांसाठी जहाज बांधणीत देश आत्मनिर्भर बनला आहे आणि इतर देशांसाठी जहाजांची बांधणी सुरु केली आहे ही बाब आनंददायी आहे असे ते म्हणाले.
गोवा शिपयार्ड लिमिटेड या प्रमुख भारतीय जहाज निर्मिती कंपनीने 583 कोटी रुपये खर्चासह भारतीय तटरक्षक दलासाठी दोन प्रदूषण नियंत्रण जहाजे तयार करण्यासंबंधी करारावर स्वाक्षरी केली होती . पहिल्यांदाच या जहाजांची रचना आणि बांधणी स्वदेशी पद्धतीने केली जात आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने देशातच जहाजाची रचना आणि बांधणी केली आहे. जहाजाची लांबी 114.5 मीटर, रुंदी 16.5 मीटर आहे. 21 नोव्हेंबर 2022 रोजी जहाजाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली होती.
जलावतरण सोहळ्याला जीएसएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांच्यासह संरक्षण मंत्रालय, तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि गोवा शिपयार्ड लि.चे अधिकारी उपस्थित होते.
‘समुद्र प्रताप’ हे देशाच्या जहाज बांधणी क्षमतेचा अनुकरणीय दाखला असून त्याने गोवा शिपयार्ड लिमिटेडला अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण जहाजे तयार करण्यास सक्षम भारतीय जहाज बांधणी कंपन्यांच्या श्रेणीत आणले आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049946)
Visitor Counter : 93