कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या हस्ते सातव्या अनुभव पुरस्कार सोहळ्यात पाच अनुभव पुरस्कार आणि 10 ज्युरी प्रमाणपत्रे प्रदान

Posted On: 28 AUG 2024 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024


केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेतील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सातव्या अनुभव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग केले होते. या समारंभात नऊ विविध मंत्रालये, विभागांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना पाच अनुभव पुरस्कार आणि 10 ज्युरी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण 15 पुरस्कार विजेत्यांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. ही आजवरच्या या पुरस्कार विजेत्यांमधील महिलांची एका खेपेतील सर्वात मोठी संख्या ठरली आहे. पुरस्कार विजेत्यांच्या सेवेतील योगदानाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन आणि त्यांच्या कठोर परिश्रमांचे दर्शन घडवणाऱ्या लघुपटाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले.

निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने 31 मार्च 2025 पर्यंत निवृत्त होणार असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 55व्या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन 28 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली इथे विज्ञान भवनातील सभागृहात केले होते.

या कार्यशाळेत भविष्य पोर्टल, एकात्मिक निवृत्तीवेतनधारक पोर्टल, निवृत्तीचे लाभ, कुटुंब निवृत्तीवेतन, सीजीएचएस प्रक्रिया, आयकर नियम, अनुभव, हयात असल्याचा डिजिटल दाखला, गुंतवणुकीच्या संधी व माध्यमे इ. विविध सत्रे घेण्यात आली. निवृत्त होणार असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीची प्रक्रिया समजावून देणे, निवृत्तीपूर्वी भरण्याच्या विविध अर्जांची आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने या सत्रांची आखणी केलेली आहे.

कार्यशाळेमध्ये बँकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. निवृत्तीवेतन देणाऱ्या 18 बँकांचा या प्रदर्शनात सक्रिय सहभाग होता. निवृत्तीवेतनधारकांशी संबंधित सर्व बॅंकिंग सेवा सहभागींना उपलब्ध करून देण्यात आल्या. निवृत्तीवेतन खाते उघडण्याबाबत आणि निवृत्तीनंतर गुंतवणुकीच्या विविध योजनांबाबत बँकांनी सहभागींना मार्गदर्शन केले.

31 मार्च 2025 पर्यंत निवृत्त होणार असलेल्या 750 हून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचा लाभ घेतला. सुशासनाचा उपक्रम म्हणून आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विभाग अशा कार्यशाळांचे आयोजन करत राहील. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकार राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विभाग सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे.

निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने 11 वे देशव्यापी निवृत्तीवेतन न्यायालयही निवृत्तीवेतन सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट 2024रोजी नवी दिल्ली इथे भरवले. न्यायालयात भारत सरकारच्या 22 मंत्रालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि निवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष व दूरदृश्य माध्यमातून हजेरी लावली. न्यायालयात 298 प्रकरणांवर चर्चा झाली व 245 प्रकरणे तात्काळ निकालात काढण्यात आली. 82 टक्क्यांहून अधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात यश आले.

 S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 
 

 

 



(Release ID: 2049585) Visitor Counter : 35


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi