नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी प्रमुख बंदरांच्या कामगारांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्यास दिली मंजुरी


द्विपक्षीय वेतन वाटाघाटी समिती आणि भारतीय बंदर संघटना दरम्यान सामंजस्य करारावर करण्यात आली स्वाक्षरी

Posted On: 28 AUG 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी  वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे द्विपक्षीय वेतन वाटाघाटी समिती आणि भारतीय बंदर संघटना दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, परिणामी भारतातील 12 प्रमुख बंदरांमधील कामकाजात व्यत्यय आणणारा अनिश्चित काळासाठीचा संप टळला आहे.

सामंजस्य करारामुळे वेतन संरचनेत सुधारणा करण्यात आली असून  निवृत्तीवेतन लाभांसह इतर सेवा अटींची  पूर्तता झाली आहे. या करारानुसार 31-12-2021 पर्यंत मूळ वेतनाच्या एकूण रकमेवर 8.5% फिटमेंट लाभ, तसेच 1-1-2022 पर्यंत 30% व्हीडीए देण्याबाबत सहमती झाली. सेटलमेंट कालावधी पाच वर्षांसाठी 1-1-2022 ते 31-12-2026 पर्यंत निर्धारित केला आहे. 1-1-2022 पासून लागू होणारी नवीन वेतनश्रेणी सध्याच्या पद्धतीनुसार आखली जाईल.

संभाव्य विसंगती टाळण्यासाठी, 1-1-2027 पासून,  अधिकारी आणि कर्मचारी दोघांसाठी भविष्यातील वेतन सुधारणांचा कालावधी अनुरूप करण्याबाबत विचार करण्यास दोन्ही बाजूकडून सहमती दर्शवण्यात आली.

याशिवाय 1-1-2022 ते 31-12-2026 पर्यंत,किंवा सेवारत कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत, यापैकी जे आधी येईल त्या सेटलमेंट कालावधीत कार्यरत कर्मचाऱ्यांना दरमहा 500 रुपये विशेष भत्ता दिला जाईल.

यशस्वी तोडगा निघाल्याबद्दल, बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, "भारतीय सागरी क्षेत्राचा कणा असलेल्या आमच्या बंदर कामगारांना न्याय्य आणि समान वागणूक सुनिश्चित करण्याच्या दिशेने  हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या समस्यांचे वेळेवर निराकरण करून देशातील  सर्व  बंदरांवर एक सामंजस्यपूर्ण आणि उत्पादक वातावरणाला चालना देण्याप्रति  बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालयाची  वचनबद्धता दिसून येते." या वाटाघाटींप्रति  रचनात्मक दृष्टिकोनाबद्दल  सोनोवाल यांनी कामगार महासंघ आणि भारतीय बंदर संघटना  या दोघांचेही कौतुक केले.

28-8-2024 रोजी बोलावण्यात येणारी मसुदा समितीची बैठक दहा दिवसांत तोडगा तयार करेल. या समितीमध्ये प्रत्येक महासंघाचा एक प्रतिनिधी, तसेच भारतीय बंदर संघटनेच्या अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधींचा समावेश असेल. व्यवस्थापनाने आश्वासन दिले की द्विपक्षीय वेतन वाटाघाटी समितीची  कार्यवाही पूर्ण केली जाईल आणि अंतिम तोडगा 15 दिवसांत निघेल. या घडामोडीचा विचार करून, सहा महासंघांनी याआधी 28 ऑगस्ट 2024 रोजी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

वेळीच हस्तक्षेप आणि प्रदीर्घ वेतन वाटाघाटींचे निराकरण करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केल्याबद्दल सर्बानंद सोनोवाल यांचे सहा महासंघांनी आभार मानले.

 
S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2049552) Visitor Counter : 84