संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय नौदलाची तबर युद्धनौका दोन दिवसांच्या स्पेन भेटीसाठी मालागा येथे पोहोचली

Posted On: 27 AUG 2024 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्ट 2024

 

भारतीय नौदलाची आयएनएस तबर ही युद्धनौका दोन दिवसांच्या स्पेन भेटीसाठी 25 ऑगस्ट 2024 रोजी मालागा येथे पोहोचली. आयएनएस तबरची धुरा कॅप्टन एमआर हरीश यांच्याकडे असून भारत आणि स्पेन या देशांदरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध अधिक वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट आयोजित करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे स्पॅनिश दूतावासाच्या उद्घाटनासह 1956 मध्ये भारत आणि स्पेन यांच्यातील राजनैतिक संबंधांची सुरुवात झाली. स्पेनला लाभलेल्या विस्तीर्ण किनाऱ्यामुळे, सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात स्पेनचा मोठेपणा भारताने नेहमीच मान्य केला असून विविध संरचनात्मक आणि सहयोगी उपक्रमांच्या माध्यमातून भारत वेळोवेळी स्पेनसोबत एकत्र आला आहे. या नात्याला आणखी बळकटी देण्याच्या तसेच सागरी क्षेत्रातील संबंध आणखी बळकट करण्याचे नवे मार्ग शोधण्याच्या उद्देशाने आयएनएस तबरची ही भेट आयोजित करण्यात आली आहे.

मालागा बंदरातील दोन दिवसांच्या मुक्कामात, नौकेवरील कर्मचारीवर्ग स्पेनच्या नौदलासोबत विविध व्यावसायिक संवादांचे उपक्रम हाती घेईल. त्यानंतर, मालागा बंदरातून निघाल्यावर, भारतीय नौदलाची तबर ही नौका स्पॅनिश नौदलातील ‘अटालया’ या नौकेसोबत समुद्रात पीएएसएसईएक्स हा उपक्रम देखील पार पाडेल. दोन्ही देशांच्या नौदलांच्या दरम्यान आंतर-परिचालनात्मकतेत वाढ करणे तसेच दोन्ही बाजूंच्या नौदल कर्मचाऱ्यांना परस्परांच्या सर्वोत्कृष्ट पद्धतींचे निरीक्षण करून त्या आत्मसात करण्याची संधी मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जगातील विविध देशांच्या नौदलांशी भागीदारीचे नाते जोपासण्याप्रती भारतीय नौदल प्रतिबद्ध आहे.

आयएनएस तबर ही युद्धनौका विविध शत्रास्त्रांनी आणि संवेदकांनी सुसज्जित असून भारतीय नौदलाच्या सर्वात प्राचीन स्टील्थ युद्धनौकांपैकी एक आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांड अंतर्गत परिचालित मुंबईस्थित स्वोर्ड आर्म ताफ्याचा भाग आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2049224) Visitor Counter : 47


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil