सांस्कृतिक मंत्रालय
बिहारमधील नालंदा येथे ‘गुरू पद्मसंभव यांचे जीवन आणि वारसा’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ करणार आयोजन
Posted On:
27 AUG 2024 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2024
बिहारमधील नालंदा येथे 28 आणि 29 ऑगस्ट, 2024 रोजी ‘गुरू पद्मसंभव यांचे जीवन आणि वारसा’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. नव नालंदा महाविहाराच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ या परिषदेचे आयोजन करणार आहे. गुरू रिनपोचे म्हणूनही ओळखले जाणारे गुरू पद्मसंभव हे आठव्या शतकात प्राचीन भारतात वास्तव्यास होते. हिमालयाच्या पट्ट्यात बुद्ध धम्माचा प्रसार करण्याचे श्रेय आज बुद्ध धम्मातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुरू पद्मसंभव यांना जाते.
बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुसरे बुद्ध म्हणून ओळखले जाणारे गुरू पद्मसंभव, ज्यांना गुरू रिनपोचे देखील संबोधले जाते, ते हिमालयातील प्रसिद्ध ऋषी (किंवा संत) असून ते प्राचीन भारतात आठव्या शतकात वास्तव्यास होते.
परिषदेच्या मुख्य विषयांमध्ये गुरू पद्मसंभव यांचे जीवन आणि शिकवण, हिमालय परिसरात केलेला प्रवास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या काळातील त्यांच्या उपदेशाची प्रासंगिकता यांचा समावेश असेल. गुरू पद्मसंभव हे योगिक आणि तांत्रिक पद्धतींपासून ते ध्यान, कला, संगीत, नृत्य, जादू, लोककथा आणि धार्मिक शिकवणींपर्यंत संस्कृतीच्या अनेक पैलूंच्या संगमाचे प्रतिनिधित्व करत होते. या परिषदेत हस्तलिखिते, पवित्र अवशेष, चित्रे आणि स्मारकांच्या माध्यमातून गुरू पद्मसंभव यांचा धम्म वारसा साजरा करण्याचा सर्वसमावेशक प्रयत्न केला जाणार आहे.
बुद्ध धम्माच्या मूलभूत तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असताना, गुरू पद्मसंभव यांनी त्या त्या ठिकाणाची वैशिष्ट्ये आणि तेथील लोकांच्या संवेदना समजून घेतल्या होत्या. त्यामुळे, त्यांनी आपल्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी स्थानिक म्हणी, भाषा आणि संस्कृतीचा वापर केला होता. याच कारणाने त्यांची शिकवण विश्वासाने आत्मसात करणे लोकांना अधिक सोपे झाले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049179)
Visitor Counter : 48