वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी धोरणात्मक गुंतवणूक संवादाच्या माध्यमातून भारत-सिंगापूर आर्थिक सहकार्याच्या विस्ताराबाबत केली चर्चा
Posted On:
25 AUG 2024 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सिंगापूरमध्ये टेमासेक होल्डिंग्ज, डीबीएस बँक, ओएमईआरएस, केप्पल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीव्हीएस मोटर कंपनी यांसारख्या सिंगापूरमधील व्यापार जगतातील आघाडीच्या कंपन्यांसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
सिंगापूर येथे 26 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल आज (25 ऑगस्ट 2024 रोजी) सिंगापूर येथे पोहोचले.
उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकांमध्ये भारत आणि सिंगापूर दरम्यान गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्याबाबत तसेच त्या वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. चर्चेदरम्यान विविध क्षेत्रांमध्ये परस्पर विकास आणि सहकार्य यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेणे, देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ घेणे आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या चर्चांमध्ये विशेषत: लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, भारतातील गुंतवणुकीचे वातावरण अनुकूल करणे, कार्बन उत्सर्जन कमी करून शाश्वत विकासाला पाठबळ देणे आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत कुटुंबाच्या मालकीच्या व्यवसायांबरोबर सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. या बैठकांमधून परस्पर विकास आणि नवोन्मेषासाठी भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक संबंध मजबूत करण्याप्रति वचनबद्धता अधोरेखित झाली.
अत्याधुनिक शिक्षणाला अनुकूल वातावरण विकसित करण्यासाठी भारत आणि सिंगापूर दरम्यान सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुख्यालय आणि सिंगापूरमधील आयटीई कॉलेज सेंट्रलला देखील भेट दिली.
विविध उद्योगांच्या वैविध्यपूर्ण गरजांनुरुप भविष्यात उपयुक्त कौशल्यांसह युवा प्रतिभावंतांना तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. गोयल यांनी या दौऱ्यादरम्यान, एरोस्पेस आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग हबसह त्यांच्या शैक्षणिक केंद्रांना देखील भेट दिली आणि निरंतर शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या विचारांबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
या चर्चा आणि भेटी भारत आणि सिंगापूर यांच्यातील मजबूत आणि वाढते संबंध अधिक बळकट करतात. त्याचबरोबर भविष्यातील वाढ आणि विकासाला गती देण्यात त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक भागीदारींचे धोरणात्मक महत्त्वही अधोरेखित करतात. सिंगापूर हा भारतासाठी थेट परदेशी गुंतवणूकीचा प्रमुख स्त्रोत आहे. सन 2023-24 मध्ये, सिंगापूर मधून भारतात अंदाजे 11.77 अब्ज डॉलर्स इतकी थेट परदेशी गुंतवणुक आली होती. द्विपक्षीय व्यापाराच्या बाबतीत, सिंगापूर 2023-24 मध्ये 35.61 अब्ज डॉलर्सच्या एकूण व्यापारासह भारताचा 6वा सर्वात मोठा जागतिक व्यापार भागीदार होता.
* * *
JPS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048894)
Visitor Counter : 33