वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान देत, लाखो देशवासीयांना रोजगार उपलब्ध करतात आणि ते मोठ्या उद्योगांसाठी महत्त्वाच्या पुरवठा साखळ्या आहेत: श्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
गुणवत्ता नियंत्रण आदेश हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे देशाबाहेरील अनुचित स्पर्धेपासून संरक्षण करतात : श्री गोयल
Posted On:
24 AUG 2024 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
एमएसएमईजकडे केवळ एक लहान उद्योग म्हणून बघता कामा नये, त्यांची उद्दिष्टे लहान किंवा नकारात्मक असू नये कारण एमएसएमई ही देशातील एक मोठी शक्ती आहे. हे उद्योग यशस्वी आहेत, देशाची ताकत आहेत, लाखो देशवासीयांना त्यामुळे रोजगार उपलब्ध होत असून राष्ट्र उभारणीत त्यांचे मोठे मोठे योगदान असते, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे केले. दहाव्या इंडिया इंटरनॅशनल एमएसएमई स्टार्टअप एक्स्पो आणि समिट - 2024 मध्ये ते बोलत होते.
नवनवीन संकल्पना आणि काम करण्याच्या नवीन पद्धती ही एमएसएमईच्या उद्योजकांची ओळख आहे, असे गोयल यांनी यावेळी अधोरेखित केले. मोठे उद्योग आणि उपक्रमांच्या संपूर्ण परिसंस्थेमध्ये हजारो नवनवीन एमएसएमईजचा समावेश असतो; ज्यांच्याशिवाय हे मोठे उद्योग यशस्वी होऊ शकत नाहीत, तसेच एमएसएमई मोठ्या उद्योगांचे पुरवठादार आणि ग्राहक म्हणून काम करतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
एमएसएमई देशाच्या पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि भारताच्या निर्यातीतही त्यांचा मोठा वाटा आहे, असे गोयल यांनी सांगितले. या क्षेत्राचा विकास देशासाठी अत्यावश्यक आहे आणि सरकारचे ते उद्दिष्टही आहे, असे ते म्हणाले. जेव्हा 140 कोटी देशवासी राष्ट्र उभारणीच्या कामी योगदान देण्यासाठी एकत्र येतील, तेव्हाच 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला येईल आणि आपण सर्वजण समृद्धीकडे वाटचाल सुनिश्चित करू शकू, असे प्रतिपादन वाणिज्य मंत्र्यांनी यावेळी केले.
गुणवत्ता नियंत्रण आदेशांच्या (QCO) माध्यमातून सरकार एमएसएमई क्षेत्राला सहाय्य करत आहे, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. “आम्ही एमएसएमईंना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ देत आहोत, यांचा एमएसएमईंना दोन प्रकारे लाभ होईल. एक म्हणजे QCOs मुळे देशाबाहेरून अयोग्य दराने निकृष्ट वस्तूंची आयात थांबेल तसेच त्यायोगे एमएसएमई क्षेत्राला अनुचित स्पर्धेपासून संरक्षण मिळून मदत होईल; दुसरे म्हणजे, जेव्हा एमएसएमई मानकांची पूर्तता करतील, तेव्हा ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेशी मुकाबला करुन शकतील आणि लाभदायक होऊ शकतील. क्यूसीओमुळे वैयक्तिक क्षेत्रांत कसा लाभ झाला आहे, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
* * *
M.Pange/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048507)
Visitor Counter : 47