आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी पोर्टलचे केले उद्घाटन
नॅशनल मेडिकल रजिस्टर हे भारतातील सर्व ॲलोपॅथिक (एमबीबीएस) नोंदणीकृत डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत डेटाबेस ठरणार
नॅशनल हेल्थ रजिस्टर हे एक बहुप्रतीक्षित पाऊल असून, ते डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्थेला बळकटी देईल : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा
देशात एक व्यापक डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्था तयार करण्याची आमची योजना असून डॉक्टरांची डिजिटल नोंदणी हा या परिसंस्थेचा प्रमुख आधारस्तंभ आहे: केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल
सरकार ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या दृष्टीकोनाने काम करत असून, एनएमआर पोर्टल हे नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Posted On:
23 AUG 2024 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत भारतात नोंदणीसाठी पात्र असलेल्या सर्व एमबीबीएस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी (एनएमआर) पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते.
एनएमसी कायदा, 2019 च्या कलम 31 अंतर्गत, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासाठी हे बंधनकारक आहे की, एनएमसीचे नैतिकता आणि वैद्यकीय नोंदणी मंडळ (EMRB) देशातील परवानाधारक वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव, पत्ता आणि त्याच्या सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रतांची इलेक्ट्रॉनिक स्वरूपात राष्ट्रीय नोंदणी ठेवेल.
नॅशनल मेडिकल रजिस्टर (एनएमआर) हा भारतातील सर्व ॲलोपॅथिक (MBBS) नोंदणीकृत डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत डेटाबेस असेल. एनएमआर चे वेगळेपण हे आहे की, ते डॉक्टरांच्या आधार आयडी (ओळख) बरोबर जोडलेले आहे, जे प्रत्येक व्यक्तीची सत्यता सुनिश्चित करते.
उपस्थितांना संबोधित करताना नड्डा यांनी एनएमसी आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची (NHA) प्रशंसा केली, ज्यांनी कठोर परिश्रम करून राष्ट्रीय आरोग्य नोंदणीची निर्मिती केली, जी भारतातील सर्व ॲलोपॅथिक (MBBS) नोंदणीकृत डॉक्टरांसाठी एक सर्वसमावेशक आणि अद्ययावत डेटाबेस म्हणून उपयोगी ठरेल.
ते म्हणाले की, भारताला डिजिटल सक्षम बनवण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन असून, आरोग्य परिसंस्था देखील डिजिटल दृष्ट्या बळकट असेल तर ते शक्य होईल. नॅशनल हेल्थ रजिस्टर, अर्थात राष्ट्रीय आरोग्य सेवा नोंदणी पुस्तक हे या दिशेने एक बहुप्रतीक्षित पाऊल असून, ते डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्थेला बळकटी देईल आणि भारतातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करेल, असे ते म्हणाले. पोर्टल वरील नोंदणी प्रक्रियेत सतत सुधारणा करून राष्ट्रीय वैद्यक सेवा नोंदणी अद्ययावत ठेवली जाईल असे त्यांनी सांगितले.
राज्य वैद्यकीय परिषदेच्या (एसएमसी) भूमिकेवर प्रकाश टाकताना केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, राष्ट्रीय वैद्यक सेवा नोंदणीचा विकास आणि देखभाल करण्यामध्ये तसेच ही प्रक्रिया सुलभ करण्यामध्ये राज्य वैद्यकीय परिषदा प्रमुख भागधारक आहेत. सर्व एसएमसी नी यामध्ये सक्रीयपणे सहभागी व्हावे आणि नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी, कारण त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि प्रमाणीकरणाचा वेग हा एनएमआर च्या यशात महत्वाचा घटक ठरेल, असे ते म्हणाले. पॅरामेडिक्स आणि इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी अशा प्रकारे नोंदणी सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
एनएमआर पोर्टलचा प्रारंभ “एक महत्त्वाचा प्रसंग” असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल म्हणाल्या. “नॅशनल मेडिकल रजिस्टरची गरज फार पूर्वीपासून जाणवत असून एनएमआर डेटा महत्वाचा आहे कारण तो देशभरातील डॉक्टरांचा विश्वासार्ह डेटा आहे. डॉक्टरांचा आजपर्यंतचा डेटा विखुरलेल्या स्वरूपात आहे ज्याचे अद्ययावतीकरण आवश्यक असून एनएमआर पोर्टल या डेटाचे अद्यतनीकरण सुनिश्चित करेल, असेही त्यांनी सांगितले. सुलभ नोंदणी प्रक्रियेमुळे विश्वासार्ह डेटाची देखभाल सुनिश्चित होईल. माहितीची ही सत्यता खूप मोलाची आहे कारण भारताला एक प्रचंड डिजिटल आरोग्य परिसंस्था निर्माण करायची आहे आणि त्यासाठी डॉक्टरांची डिजिटल नोंद तयार करणे हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असेल.” असे त्या म्हणाल्या.
एनएमआरचे महत्त्व अधोरेखित करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की एनएमआर पोर्टल देशातील डॉक्टरांचा लवचिक , विश्वासार्ह आणि संकलित डेटा सुनिश्चित करेल. पोर्टलवरील जलद आणि सुलभ नोंदणी प्रक्रिया डेटा वेळोवेळी अपडेट करणे सुलभ करेल. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांची पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढेल आणि लोकांना पारदर्शक पद्धतीने सत्यापित झालेली माहिती मिळाल्याने त्यांचा आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले. सरकार पंतप्रधानांच्या " रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म" च्या दृष्टिकोनानुसार काम करत असून एनएमआर सुरु करणे हे लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
“आजपर्यंत, देशातील एकूण डॉक्टरांची संख्या, देश सोडून गेलेले डॉक्टर, ज्यांनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना गमावला आहे असे डॉक्टर, किंवा ज्या डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांची संख्या आणि तपशील यासारख्या पैलूंचे तपशीलवार आणि सर्वांगीण चित्र देऊ शकेल अशा सर्वसमावेशक डेटाचा अभाव होता, असे या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले. एनएमआर लाँच केल्याने 13 लाखाहून अधिक डॉक्टरांच्या डेटाची तरतूद सुनिश्चित होईल.” असेही ते म्हणाले. "एनएमआर हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत वैद्यकीय व्यावसायिकांच्या नोंदणीचा एक भाग राहणार असून त्यात वैद्यकीय व्यावसायिकांचे सर्व तपशील असतील." हे चंद्र यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला राज्य वैद्यकीय परिषदेचे प्रतिनिधीही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
पार्श्वभूमी: एनएमआर हा भारतातील सर्व नोंदणीकृत ॲलोपॅथिक (MBBS) डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक डेटाबेस असेल. एनएमआर चे वेगळेपण हे आहे की ते डॉक्टरांच्या आधार आयडीशी जोडलेले आहे ज्यामुळे व्यक्तीची सत्यता सुनिश्चित होते. एनएमआर मध्ये नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ही एक अतिशय सोपी ऑनलाइन प्रक्रिया आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स (INIs) इ. सह). पोर्टलवर राज्य वैद्यकीय परिषद (SMC) एकमेकांशी जोडलेले आहेत.
इंडियन मेडिकल रजिस्टर (IMR) वर याआधीच नोंदणी केलेल्या सर्व MBBS डॉक्टरांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या (NMC) एनएमआर वर पुन्हा नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी, डॉक्टरांना पदवी (MBBS) प्रमाणपत्राची डिजिटल प्रत, तसेच डॉक्टरांनी सर्वप्रथम नोंदणी केलेल्या स्टेट मेडिकल कौन्सिल/मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल प्रत तयार ठेवणे आवश्यक आहे. प्रक्रिया सुरू करण्यासाठी डॉक्टरकडे आधार क्रमांक देखील तयार असणे आवश्यक आहे. एनएमआर मध्ये नोंदणीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://nmr-nmc.abdm.gov.in/nmr/v3/
ST/NC/RA/SM/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048358)
Visitor Counter : 104