अंतराळ विभाग

केंद्रीय अर्थसंकल्पातील अंतराळ क्षेत्राशी संबंधित घोषणांमधून दूरदृष्टी दिसून येत  असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


पुढील 10 वर्षांत अंतराळ अर्थव्यवस्था पाचपट किंवा सुमारे 44 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल असा अंदाज: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 17 AUG 2024 7:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मधील अंतराळ क्षेत्राशी संबंधित घोषणांमधून दूरदृष्टी दिसून येत असल्याचे  अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.

अंतराळ क्षेत्र मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भूतकाळातील निर्बंध तोडले असून, याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी यांना जात असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी ‘ओपन (OPEN)’ या मासिकाचे संपादक राजीव देशपांडे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. ते पुढे म्हणाले की, जवळजवळ 60-70 वर्षे अंतराळ क्षेत्र स्वत:च  लादलेल्या गुप्ततेच्या पडद्याआड काम करत होते. त्यामुळे हे क्षेत्र साधनसंपत्ती आणि ज्ञानापासून वंचित राहिले. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नव्हती, असे ते म्हणाले.

वर्ष 2023 चे  नवीन अंतराळ धोरण, हा परिवर्तनकारी क्षण होता, जेव्हा प्रथमच खासगी क्षेत्राला इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ष 2023 मध्ये या क्षेत्रात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, पुढील 10 वर्षांत अंतराळ अर्थव्यवस्था पाचपट किंवा सुमारे 44 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे.

अंतराळ क्षेत्रातील संभाव्य रोजगाराच्या संधींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या क्षेत्रामुळे इथल्या अशा प्रतिभावंतांना रोजगार मिळेल, जे कदाचित परदेशात स्थलांतरित झाले असते. आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता कधीच नव्हती, ते म्हणाले.  यापूर्वी विविध मार्ग उपलब्ध नव्हते, पण आता अंतराळ क्षेत्रात केवळ रोजगाराच्या नव्हे, तर स्टार्टअपसारख्या आकर्षक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. उपजीविकेचे नवे क्षेत्र खुले झाले आहे, ते म्हणाले.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2046372) Visitor Counter : 13


Read this release in: English , Urdu , Tamil