युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला दिल्या शुभेच्छा ; निरोप समारंभात झाले सहभागी


पॅरा-ॲथलीट्स भारताच्या भावनेला मूर्त रूप देतात आणि आपल्या 1.4 अब्ज नागरिकांसाठी प्रेरणेचा एक गहन स्रोत म्हणून काम करतात- डॉ. मांडविया

Posted On: 16 AUG 2024 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित निरोप समारंभात पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेही यावेळी उपस्थित होत्या.

खेळाडूंचे कौतुक करताना डॉ.मांडविया म्हणाले, “आपल्या पॅरा-ॲथलीट्समध्ये अडथळ्यांवर मात करण्याची आणि आव्हानांना संधींमध्ये बदलण्याची अचाट  क्षमता आहे. पॅरा-ॲथलीट्स भारताच्या भावनेला मूर्त रूप  देतात आणि आपल्या 1.4 अब्ज नागरिकांसाठी प्रेरणेचा एक गहन स्रोत म्हणून काम करतात.”

आपल्या खेळाडूंना स्पर्धेच्या सर्वोच्च स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि सहाय्य पुरवण्याप्रति  सरकारच्या अतूट बांधिलकीवर डॉ. मांडविया यांनी भर दिला. त्यांनी खेलो इंडिया उपक्रमाच्या यशाचा ठळक उल्लेख केला ज्याने अनेक खेळाडूंच्या  विकासाला गती  दिली , तसेच टार्गेट  ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) द्वारे 50 पॅरा-ॲथलीट्सना दिलेले सहाय्य देखील त्यांनी नमूद केले.

"यावेळी, आम्ही 84 पॅरा-ॲथलीट्सचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवत आहोत जे 12 खेळांमध्ये भाग घेईल ," असे त्यांनी नमूद केले. भारताच्या पॅरा-ॲथलीट्सची वाढती ताकद आणि प्रतिभा यातून दिसून येते. तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅनोईंग, सायकलिंग, ब्लाईंड  ज्युडो, पॉवरलिफ्टिंग, रोइंग, नेमबाजी, जलतरण , टेबल टेनिस आणि तायक्वांदो यासह 12 क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू भाग घेतील.

या खेळाडूंना त्यांचे  कुटुंबीय आणि प्रशिक्षकांचा अनमोल  पाठिंबा आहे याकडे लक्ष वेधत त्यांनी त्यांची प्रशंसा देखील केली.त्यांच्या समर्पण आणि अतूट वचनबद्धतेची दखल घेत ते म्हणाले ,"तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून तुमच्या पाठीशी उभे राहिलेल्या तुमच्या कुटुंबीयांना आणि प्रशिक्षकांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. "

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ‘मचा धूम’ या विशेष गीताचेही अनावरण झाले. 3-मिनिटे 16-सेकंदांच्या या प्रोत्साहनपर गीताचा उद्देश खेळाडूंना एकत्र आणणे आणि स्पर्धेची भावना प्रज्वलित करणे हा आहे.

आपल्या भाषणात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खेळाडूंच्या उल्लेखनीय समर्पण आणि निर्धाराचे  कौतुक केले."आपल्या खेळाडूंनी अतुलनीय  लवचिकता  दाखवली आहे आणि त्यांचा प्रवास ही खरी प्रेरणा आहे.आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे."असे त्या म्हणाल्या.

भारताच्या पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी पॅरालिंपियन्सना दिलेल्या पाठिंब्याबद्दल सरकारचे आभार मानले. लवचिकता आणि निर्धाराचे दर्शन घडवत पॅरिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत असलेल्या खेळाडूंप्रति त्यांनी अभिमान व्यक्त केला.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2046147) Visitor Counter : 71