आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात डिजिटल आरोग्य शिक्षण अभियानासंदर्भात सामंजस्य करार
वैद्यकीय अभ्यासक्रमात डिजिटल आरोग्य शिक्षण अंतर्भूत करण्यात आणि अधिक समन्वय असलेल्या प्रभावी आरोग्य सेवा परिसंस्थेचा पाया रचण्यात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यातील करार अतिशय महत्वपूर्ण: जे पी नड्डा
Posted On:
13 AUG 2024 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2024
संपूर्ण भारतात डिजिटल आरोग्य शिक्षण अभियान राबवण्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणारा सामंजस्य करार आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत झाला. या सहकार्याचा एक भाग म्हणून, आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) च्या अंमलबजावणीला पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने सुचवल्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपला डिजिटल आरोग्य फाउंडेशन अभ्यासक्रम (DHFC) प्राधिकरणाला देणार आहे आणि अतिरिक्त डिजिटल आरोग्य कार्यक्रमांचा एकत्रितपणे विकास करणार आहे.
प्राधिकरण, आंतर परिचालनात्मक डिजिटल आरोग्य परिसंस्थेच्या विकासासाठी देशातील डिजिटल आरोग्य परिदृश्यात सरकारी धोरणाचे नेतृत्व करत राहील. या सामंजस्य करारामध्ये भविष्यात असे आणखी अभ्यासक्रम विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमात डिजिटल आरोग्य शिक्षण अंतर्भूत करण्यात आणि अधिक समन्वय असलेल्या प्रभावी आरोग्य सेवा परिसंस्थेचा पाया रचण्यात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यातील करार अतिशय महत्वपूर्ण असा मैलाचा दगड ठरेल, असे जगत प्रकाश नड्डा यांनी या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना सांगितले. या भागीदारीमुळे वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि व्यावसायिक यांची कौशल्यवृद्धी तर होईलच शिवाय आयुष्मान भारत डिजिटल मिशनची व्यापक अंमलबजावणी देखील होईल, परिणामी लाखो भारतीयांना उत्तम आरोग्यसेवेचा लाभ सहजगत्या होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
या सामंजस्य करारामुळे त्यांच्या क्षमता निर्माणचा मार्ग तर मोकळा होईलच शिवाय देशातील डिजिटल अध्यापन परिदृश्यात देखील त्याचे महत्वपूर्ण योगदान असेल. आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता-निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कौतुक केले. प्राधिकरण याची व्याप्ती तळागाळापर्यंत नेईल आणि त्यामुळे आपल्या देशाच्या आरोग्य देखभाल परिसंस्थेला सामर्थ्य मिळेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबतची आमची भागीदारी संपूर्ण भारतात डिजिटल आरोग्य विषयक उपाययोजनांचा उपायांचा अवलंब करायला गती देण्यात एक परिवर्तनकारी भूमिका बजावेल तसेच या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन भविष्यातील आरोग्य व्यावसायिक रुग्णांच्या आरोग्यात अधिक उत्तम सुधारणा घडवून आणण्यात आणि कार्यक्षम आरोग्य सेवा देण्यात अतिशय उत्तम प्रकारे सज्ज आहेत याची खात्री होईल, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती गौर मुखर्जी म्हणाल्या.
सध्याच्या आरोग्यसुविधा क्षेत्रात डिजिटल आरोग्य हा मुद्दा आघाडीवर असून या युगात डिजिटल आरोग्य आणि रुग्णांच्या देखभालीतील त्याचा वापर म्हणजे काय हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात डिजिटल आरोग्य हा विषय उपलब्ध करून देऊन हा बहुमान प्राप्त करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनवले हा अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रीय स्तरावर याच्या अंमलबजावणीकरता प्राधिकरणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, यांनी सांगितले.
हा अभ्यासक्रम मिशन कर्मयोगी च्या iGOT प्लॅटफॉर्मसह, विविध प्लॅटफॉर्मद्वारे वैद्यकीय विद्यार्थी, सेवारत डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना डिजिटल आरोग्य प्रमाणन संधी उपलब्ध करून देईल. हे त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात प्रभावीपणे आयुष्मान भारत डिजिटल मिशन लागू करण्यास मदत करेल.
पार्श्वभूमी
भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी डिजिटल आरोग्य एक प्रेरक टप्पा ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी सुरू केलेल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा उद्देश सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सक्रिय सहकार्याद्वारे एक मजबूत डिजिटल आरोग्य परिसंस्था स्थापित करणे हा आहे.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2045020)
Visitor Counter : 40