इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टाटा कंपनीच्या सेमीकंडक्टर युनिटच्या उभारणीच्या कामाला आजपासून आसाममध्ये झाली सुरुवात, 27 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पातून प्रत्यक्ष 15 हजार आणि 11 ते 13 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार
Posted On:
03 AUG 2024 7:59PM by PIB Mumbai
भारतामध्ये मागणी ते पुरवठा सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या टाटा कंपनीच्या सेमीकंडक्टर युनिटच्या उभारणीच्या कामाला आजपासून आसाममध्ये सुरुवात झाली. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा आणि टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन् उपस्थित होते. त्यानंतर रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पूर्वाभिमुख कृती धोरणावर भर दिला आहे आणि या उद्योगाच्या उभारणीला सुरुवात झाल्यामुळे आसाममध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे, असे वैष्णव म्हणाले.
भारतामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेचा एकूण 76,000 कोटी रुपये खर्चाने विकास करण्याचा कार्यक्रम 21.12.2021 रोजी अधिसूचित करण्यात आला होता.
सेमीकंडक्टर युनिटविषयी माहिती
हे युनिट 27 हजार कोटी रुपये खर्चाने उभारण्यात येणार असून, त्यामधून 15 हजार प्रत्यक्ष रोजगार आणि 11 ते 13 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी हा सेमीकंडक्टर उद्योग अनेक उद्योगांचा पाया असल्याची बाब अधोरेखित केली. यामुळे याच्याशी संबंधित असलेले अनेक मोठे उद्योग आणि लहान उद्योग यांमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या युनिटची प्रस्तावित क्षमता दिवसाला 4.83 कोटी सेमीकंडक्टर चिप्स तयार करण्याची आहे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041188)
Visitor Counter : 62