आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी 14 व्या भारतीय अवयवदान दिवस सोहळ्याला केले संबोधित

Posted On: 03 AUG 2024 5:25PM by PIB Mumbai

 

देशात अवयवदानाची प्रचंड आवश्यकता विचारात घेता मृत व्यक्ती आणि ‘ब्रेन स्टेम डेड’ अवस्थेतील लोकांचे अवयव दान करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे आणि एक अवयवदाता 8 लोकांना नवे जीवन देऊ शकतो यावर विशेष भर दिला आहे”, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले. त्या आज नवी दिल्लीत 14व्या भारतीय अवयवदान दिवस समारंभामध्ये बोलत होत्या. राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना पटेल यांनी मृत्यूनंतर अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबियांची प्रशंसा केली. अनेक लोकांचे जीव वाचवून त्यांनी महान मानवसेवा केली आहे, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण देशासाठी असे लोक प्रेरणास्रोत आहेत असे सांगत त्यांनी सर्व देशवासियांना मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्ती आणि संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच भारत अवयवदान आणि प्रत्यारोपणात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना देखील असे आवाहन केले की प्राप्त होणाऱ्या अवयवांपैकी कोणताही अवयव प्रत्यारोपणापूर्वी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी सन्माननीय अतिथी असलेले विनोद कुमार पॉल यांनी अवयवांची मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेली मोठी तफावत देखील अधोरेखित केली. अवयव प्रत्यारोपणाचे आव्हान स्वीकारण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये संस्थात्मक सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली.

केवळ 750 संस्था अवयव प्रत्यारोपणाची सेवा पुरवत असल्याची खंत व्यक्त करत, इतर संस्थांनीही अशा सेवा देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया AB PM-JAY, अर्थात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत समाविष्ट असल्याची माहिती डॉ पॉल यांनी दिली आणि विमा कंपन्यांनी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी विमा सुरक्षा द्यायला पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. "एक राष्ट्र, एक धोरण", यासारख्या अवयव प्रत्यारोपणाची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला ,ज्यामुळे अधिवास आणि वयाची अट, यासारखे अवयव प्रत्यारोपणामध्ये येणारे अडथळे दूर झाले.

भाषणाच्या अखेरीस अवयव दान करणाऱ्यांना आदरांजली अर्पण करून, या उदात्त कामासाठी लोकांनी एकत्रितपणे पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले .

अवयव प्रत्यारोपणाची गरज असणारे लोक मोठ्या संख्येने नोंदणी करत आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन, अवयवदानाविषयी जागरुकता वाढवण्याची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, बहुतेक अवयवदान कुटुंबातील सदस्यांमध्ये होत असून अवयव प्रत्यारोपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र तरीही लोकांना अवयवदानासाठी नोंदणी करायला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

यावेळीआपल्या दिवंगत प्रियजनांचे अवयव दान करण्याबाबत घेतलेल्या  धाडसी निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी अवयव दात्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा आणि अवयव दानाचा लाभ घेणाऱ्या चार जणांचा सत्कार केला. त्याशिवाय, सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये, प्रादेशिक आणि राज्य स्तरावरील अवयव आणि टिश्यू प्रत्यारोपण संस्था, वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्था, व्यावसायिक संस्था, वैद्यकीय व्यावसायिक आणि बिगर-सरकारी संस्था, यांनी अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित केले. मुंबईतील केईएम रुग्णालयाला, मृत व्यक्तीच्या अवयव दानाचा लाभ गरजू व्यक्तीला लवकरात लवकर मिळावा, यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

***

S.Kane/S.Patil/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2041155) Visitor Counter : 45