दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऍक्सेस आणि ब्रॉडबँड सेवांसाठी गुणवत्तेबाबत ट्रायकडून सुधारित मानके जारी

Posted On: 02 AUG 2024 6:02PM by PIB Mumbai

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने  'ऍक्सेस  (वायरलाईन्स  आणि वायरलेस)आणि ब्रॉडबँड (वायरलाईन्स आणि वायरलेस) सेवा नियम, 2024 (06 of 2024) साठी सेवेच्या गुणवत्तेबाबत'  सुधारित विनियम जारी केले आहेत. ऍक्सेस  (फिक्स्ड आणि मोबाइल) आणि ब्रॉडबँड सेवांसाठी हे नियम लागू आहेत. नियमांचा  संपूर्ण मजकूर ट्रायच्या www.trai.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ट्रायने यापूर्वी बेसिक आणि सेल्युलर मोबाइल सेवा, ब्रॉडबँड सेवा आणि ब्रॉडबँड वायरलेस सेवांसाठी गुणवत्तापूर्ण सेवेसंदर्भात  मानके निर्धारित करणारे तीन वेगवेगळे नियम  (i) बेसिक  टेलिफोन सेवा (वायरलाइन) आणि सेल्युलर मोबाइल टेलिफोन सेवा विनियम, 2009 च्या सेवांसाठी  गुणवत्तेची मानके  (ii) ब्रॉडबँड सेवा नियम 2006 च्या सेवेची गुणवत्ता आणि (iii) वायरलेस डेटा सेवा नियम 2012 साठी दर्जेदार सेवेची  मानके जारी केली होती ज्यात  वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली होती.

नवीन नियम वर उल्लेख केलेल्या तीन नियमांचे स्थान घेतील. वरील तीन नियम एक दशकापूर्वी अधिसूचित करण्यात आले होते. तेव्हापासून, दूरसंचार नेटवर्कचे तंत्रज्ञान पूर्णपणे बदलले आहे आणि एकत्रित नेटवर्ककडे वळले आहे. 4G आणि 5G तसेच फायबरवरील हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा यांसारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात प्रसारामुळे उद्भवलेल्या गुणवत्तेच्या पैलूंचा विचार करण्यासाठी, प्राधिकरणाने विद्यमान नियमांचा व्यापक आढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि एक सर्वसमावेशक नियामक व्यवस्था मांडली ज्यात एकाच ठिकाणी तिन्ही सेवांसाठी सेवेच्या गुणवत्तेबाबत मानकांचा समावेश आहे. या मानकांमुळे  ग्राहकांना उच्च-दर्जाची सेवा मिळेल.

18 ऑगस्ट 2023 रोजी जारी करण्यात आलेल्या 'ऍक्सेस सेवा (वायरलेस आणि वायरलाइन) आणि ब्रॉडबँड (वायरलेस आणि वायरलाईन) सेवांसाठी गुणवत्तापूर्ण सेवांच्या मानकांचा आढावा ' वरील सल्लामसलत पत्राद्वारे सविस्तर सल्लागार प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुधारित नियमांना अंतिम रूप देण्यात आले आणि हितधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या.  9 एप्रिल 2024 रोजी हितधारकांसोबत एक खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती, ज्यात हितधारक आणि ग्राहक मंचांच्या प्रतिनिधींनी नियमांच्या विविध तरतुदींबद्दल आपली मते मांडली.

सुधारित मानकांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

  • सेवा पुरवठादारांना त्यांच्या संकेतस्थळावर तंत्रज्ञान (2G/3G/4G/5G) निहाय मोबाईल सेवेचे नकाशे देणे बंधनकारक आहे, जेणेकरून ग्राहकांना जाणीवपूर्वक निर्णय घेता येतील.
  • क्यूओएस कामगिरीच्या अहवालासंदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी सेवा पुरवठादारांना क्यूओएस कामगिरी निर्धारित परिमाणांसह संकेतस्थळावर प्रकाशित करणे बंधनकारक आहे.
  • नव्याने उदयाला येणाऱ्या प्रणालींच्या कामगिरीबाबत आवश्यक गुप्त परिमाणांसाठी संदर्भस्तर जागतिक निकषांशी मिळताजुळता ठेवण्यात आला आहे. तसेच, कंप व संपुटाच्या खंडित होण्याच्या दरासाठी नवी परिमाणे लागू करण्यात आली आहेत.
  • नेटवर्कच्या समस्या सेवा पुरवठादारांना वेळेत सोडवणे शक्य व्हावे यासाठी मोबाईल सेवेच्या क्यूओएस कामगिरीचे नियमन त्रैमासिक ऐवजी दरमहा केले जाणार आहे. मात्र, त्रैमासिक वेळापत्रकावरून मासिक वेळापत्रकावर येण्याची प्रक्रिया सुलभ होण्याकरता सेवा पुरवठादारांना सुधारित मानके लागू झाल्याच्या तारखेपासून पुढे सहा महिन्यांची मुदत दिली जाणार आहे.
  • कामगिरीविषयक सूक्ष्म बाबी जाणून घेण्यासाठी नेटवर्क उपलब्धता, कॉल खंडित होणे, येणाऱ्या जाणाऱ्या मार्गांत आवाज खंडित होण्याचा दर इत्यादी बाबी एकक स्तरावर लक्षात घेऊन या ठराविक परिमाणांनुसार कामगिरीची माहिती गोळा करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
  • विविध सेवा पुरवठादारांना कामगिरीचे मूल्यमापन व अहवाल देण्यासाठी समान पद्धती स्वीकारणे शक्य व्हावे, यासाठी सविस्तर आणि असंदिग्ध मूल्यमापन पद्धती विनियमांमध्ये विहीत केल्या आहेत.
  • काही महत्त्वाची परिमाणे जसे की नेटवर्क उपलब्धता (एकूण डाउनटाईम आणि त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम झालेली एकके), कॉल खंडित होण्याचा दर, संपुट खंडित होण्याचा दर, कंप इत्यादीचा श्रेणीय पद्धतीने संदर्भस्तर उंचावण्यासाठी सेवा पुरवठादारांना गरज भासेल तेव्हा सहा महिने ते अडीच वर्षांचा कालावधी देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
  • ठराविक प्रकरणांमध्ये क्यूओएस परिमाणांवर आधारित कामगिरीची सरासरी नेमक्या समस्या ओळखण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. संपुटाच्या येण्याजाण्याच्या मार्गांत खंडित होण्याचा दर, कंप, परस्परजोडणी बिंदूवर होणारी दाटी, डाऊनलोड व अपलोडची गती, कमाल बँडविड्थचा रेडिओ आणि गाभा नेटवर्कमध्ये सर्वात जास्त व्यवहाराच्या काळात होणारा वापर इ. ही परिमाणे आहेत. त्यांच्या मूल्यमापनाचा निकष सरासरी ऐवजी पर्सेंटाईलवर आधारित करण्यात आला आहे. यामुळे सेवा पुरवठादारांना क्यूओएस कामगिरी ढासळलेले भाग नेमके ओळखून त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल.
  • मोबाईल कवरेज क्षेत्राचा नकाशा देणे बंधनकारक करण्याबरोबर नेटवर्कमधील महत्त्वाची दुरुस्तीची माहिती देणे, कंप, कमाल बँडविड्थचा रेडिओ आणि गाभा नेटवर्कमध्ये सर्वात जास्त व्यवहाराच्या काळात होणारा वापर आणि एसएमएस यशस्वीरित्या पोहोचण्याचा दर आदी नवी परिमाणे लागू करण्यात आली आहेत.

हे विनियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. याविषयी अधिक माहिती किंवा स्पष्टीकरणासाठी तेजपाल सिंह, सल्लागार (क्यूओएस-I), ट्राय यांच्याशी adv-qos1@trai.gov.in  या ईमेलवर किंवा +91-11-20907759 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

***

S.Patil/S.Kane/R.Bedekar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041039) Visitor Counter : 51