संरक्षण मंत्रालय
भारतीय तट रक्षक दलाकडून वायनाड आपत्तीतून बचाव कार्याच्या प्रयत्नांत वाढ; मदतीसाठी आधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर आणि अभिनव जहाज तैनात
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
भारतीय तटरक्षक दलाचे जिल्हा मुख्यालय (केरळ व माहे) आणि दलाचे बेपोर स्थानक यांचा वायनाड इथे आपत्तीच्या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्यात सक्रीय सहभाग आहे. उप समादेशक विवेक कुमार दिक्षित यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या 35 जवानांचे पथक चूरलमाला व भोवतालच्या गावांमध्ये 30 जुलै 2024 पासून बचाव कार्य करत आहे.
या पथकाने आपत्ती ओढवलेल्या प्रदेशात अडकलेल्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी आणि मदत छावण्यांमध्ये पोहोचण्यासाठी मदत केली आहे. ढिगारा बाजूला करून त्याखाली अडकलेल्या जिवंत व्यक्ती आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याकरता तसेच जखमींना प्रथमोपचार मिळवून पथकाचे सदस्य कार्यरत आहेत. राज्य प्रशासन, लष्कर, नौदल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), अग्नीशमन व बचाव सेवा, स्थानिक पोलीस आणि विविध स्वयंसेवी गटांच्या समन्वयाने हे मदत कार्य सुरू आहे.
आपत्ती स्थळी सुरू असलेल्या मदतीच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्यासाठी तटरक्षक दलाचे कालिकत इथून आणलेले अत्याधुनिक हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर (ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर - एएलएच) सज्ज ठेवण्यात आले आहे. याशिवाय भारतीय तटरक्षक दलाचे कोचीहून बेपोरच्या मार्गावर असलेले जहाज 'अभिनव' ही बचाव कार्यासाठी वायनाड इथे आणले जात आहे. त्यामध्ये जीवनरक्षक साहित्य, मदतीची सामग्री, औषधे आणि मदत छावण्यांमध्ये वाटपासाठी पिण्याचे पाणी आहे.
T61R.jpeg)
IUM5.jpeg)
M1E6.jpeg)
S.Kane/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2040511)
आगंतुक पटल : 99