रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दररोज 20,000 रेल्वेगाड्या सुरू ठेवण्यासाठी अथक कार्यरत राहणाऱ्या 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त

Posted On: 01 AUG 2024 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024

केंद्रीय रेल्वे तसेच माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणात असलेल्या  वित्तीय वर्ष 2024-25 साठी अनुदान मागणीवर आज संसदेत उत्तर दिले. रेल्वे मंत्रालयाचे महत्वपूर्ण यश आणि भविष्यातील नियोजनाचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला.रेल्वे कर्मचाऱ्यांची कटिबद्धता, रेल्वे सुरक्षेतील प्रगती आणि रेल्वेच्या विद्युतीकरणाची प्रगती हे त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे होते.

भाषणाच्या सुरुवातीला वैष्णव यांनी दररोज सुमारे 20,000 रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याकरता रात्रंदिवस अथक कार्यरत असलेल्या जवळपास 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी असल्याचे अधोरेखित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भार ती वाहते असे ते म्हणाले. देशाच्या सातत्यपूर्ण सुधारणेसाठी रेल्वे महत्त्वाची असल्याकारणाने रेल्वेबाबत राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी संसदेत केले.

रेल्वे सुरक्षेचे महत्त्व विषद करताना वैष्णव यांनी गेल्या दशकभरात त्यासाठी उचलेल्या महत्त्वपूर्ण पावलांविषयी सांगितले. सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर सुरक्षेतील त्रुटी समजून घेण्याकरता 26,52,000 हून अधिक अल्ट्रासॉनिक चाचण्या केल्या आहेत. परिणामी, रेल्वे रूळ भंगण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून त्या 2013-14 मधील 2,500 वरून 2024 मध्ये 85 टक्क्यांनी कमी होऊन 324 वर आल्या आहेत.

दरवर्षी होणाऱ्या अपघातांच्या संख्येची सरासरीही लक्षणीयरित्या कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात 171 असलेली संख्या विद्यमान सरकारच्या काळात 68 टक्क्यांनी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. खेरीज,दरवर्षी सुरक्षेत वाढ करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीद्वारे नियंत्रणाची सुविधा आता 2,964 रेल्वे स्थानकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या विद्युतीकरणाबाबत वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली; गेल्या दशकात याबाबतीत प्रभावशाली प्रगती झाल्याचे ते म्हणाले. एकूण 44,000 किमी लांबीचे 10 वर्षांत विद्युतीकरण झाले असून त्यापूर्वी 50 वर्षांत 20,000 किमी लांबीचे विद्युतीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेला अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणियदृष्ट्या शाश्वत बनवण्यासाठी आणि तिच्या आधुनिकीकरणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचे दर्शन रेल्वेसंदर्भातील यशाच्या मैलाचे हे दगड घडवतात.


S.Kane/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2040449) Visitor Counter : 68