संरक्षण मंत्रालय
नवी दिल्ली येथे आयोजित 83 व्या एएफएचक्यू नागरी सेवा दिनाच्या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती
Posted On:
01 AUG 2024 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
आजच्या गतिमान काळात, कार्यक्षम धोरण निर्मिती आणि संरक्षण मंत्रालयाकडून हाती घेण्यात येणाऱ्या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी आपली कौशल्य वृद्धिंगत करणे सुरू ठेवण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दल मुख्यालय(एएफएचक्यू ) नागरी सेवांच्या कर्मचाऱ्यांना केले आहे. ते 1 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे 83 व्या एएफएचक्यू नागरी सेवा दिन समारंभाला संबोधित करत होते.
नागरी सेवा म्हणजे शासनाची पोलादी चौकट असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी,एएफएचक्यू कर्मचाऱ्यांचे आत्मनिर्भरता आणि सैनिक कल्याणासाठी ते देत असलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. "तुम्ही सशस्त्र दल आणि नागरी सरकार यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा आहात.अधिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुमच्या क्षमता अधिक बळकट करण्याची गरज आहे,"असे ते म्हणाले.
सशस्त्र दल आणि नागरी सेवांनी उत्तम फलित साध्य करण्यासाठी कमांड मुख्यालय आणि सेवा मुख्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत एकत्र काम केले पाहिजे. एएफएचक्यू नागरी सेवा अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्रालयात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये समाविष्ट करून घेतल्याने निर्णय घेण्याची गुणवत्ता सुधारेल,” असे ते पुढे म्हणाले.
एएफएचक्यू नागरी सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या प्रगतीच्या शक्यतांचा शोध घेण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण विभागाला केले."त्यांच्या क्षमता वाढल्यामुळे, त्यांच्या कारकीर्दीत ते उत्तम प्रगती करतील आणि हे कर्मचारी सशस्त्र दलांना चांगले पाठबळ पुरवण्यास सक्षम होतील, आपल्या संरक्षण प्रणालीला बळ देतील. कारकिर्दीत चांगल्या संधींच्या सुनिश्चितीमुळे सर्वोत्कृष्ट उमेदवार एएफएचक्यू नागरी सेवेकडे आकर्षित होतील."असे सिंह यांनी सांगितले.
प्रामाणिकपणा, शिस्त आणि एकरूपता या मूलभूत मूल्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी कर्मचाऱ्यांना केले. एकमेकांकडून शिकण्याचे आवाहन केले.यामुळे कठीण कामही सहजसोपे होते,असे सिंह यांनी सांगितले.
संरक्षण मंत्रालयाच्या 24 आंतर-सेवा संस्था, एकात्मिक संरक्षण कर्मचारीवर्ग आणि तीन एकात्मिक सेवा मुख्यालयांमध्ये सेवा कर्मचाऱ्यांसह खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी एएफएचक्यू दिन साजरा केला जातो.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2040184)
Visitor Counter : 81