अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

भारताची स्थापित अणुऊर्जा क्षमता वर्ष 2031-32 पर्यंत तिप्पट होईल: केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


क्षमता उभारणीचे काम सुरु : केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 25 JUL 2024 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2024

वर्ष 2031-32 पर्यंत भारताची स्थापित अणुऊर्जा क्षमता तिप्पट होणार आहे. “देशातील सध्याची 8180 मेगावॉट अणुऊर्जा क्षमता 2030-31 पर्यंत 22480 मेगावॉटपर्यंत वाढेल,”केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), अणुऊर्जा विभाग,अंतराळ विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत विचारलेल्या बिगर-तारांकित प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले.
 
वर्ष 2070 पर्यंत शून्य उत्सर्जनाकडे होणाऱ्या भारताच्या ऊर्जा संक्रमणावर अधिक भर देत डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, “विविध अभ्यासांतून असे दिसून आले आहे की भारताला वर्ष 2047 पर्यंत 1 लाख मेगावॉट राष्ट्रीय अणुऊर्जा क्षमता मिळवण्याची गरज आहे. या अभ्यासांतील शिफारशींकडे भविष्यातील संभाव्य स्वीकारार्ह बाबी म्हणून पहिले जात आहे.”
 


अणुऊर्जा क्षमता वाढवण्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षांमध्ये भारताच्या अणुऊर्जा क्षमतेत 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.वर्ष 2013-14 मध्ये 4,780 मेगावॉट असलेली अणुऊर्जा क्षमता आजघडीला 8,180 मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे यावर त्यांनी भर दिला. वर्ष 2013-14 मध्ये देशातील अणुऊर्जा प्रकल्पांतून 34,228 दशलक्ष युनिट्स वीज निर्माण होत होती त्यात देखील वाढ होऊन वर्ष 2023-24 मध्ये 47,971 दशलक्ष युनिट्स वीज निर्माण होऊ लागली आहे.

देशातील 24 अणुभट्ट्यांची सध्याची स्थापित अणुऊर्जा क्षमता 8,180 मेगावॉट आहे याकडे डॉ.सिंह यांनी निर्देश केला. लिखित उत्तरातील माहितीनुसार, सध्या देशात भारतीय अणुऊर्जा महामंडळातर्फे (एनपीसीआयएल) एकूण 15300 मेगावॉट क्षमतेच्या 21 अणुभट्ट्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (भाविनी) तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (पीएफबीआर) सह एकूण 7300 मेगावॉट क्षमतेच्या नऊ (09) अणुभट्ट्यांचे बांधकाम सुरु असून भाविनी तर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 500 मेगावॉट क्षमतेच्या जुळ्या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या (एफबीआर) सह 8000 मेगावॉट क्षमतेच्या 12 अणुभट्ट्या उभारण्याचे कार्य प्रकल्प-पूर्व कामांच्या टप्प्यात आहे.


S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2037212) Visitor Counter : 70