संरक्षण मंत्रालय

संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भवनाला दिली भेट


डीआरडीओ ने हाती घेतलेले मोठे प्रकल्प, अत्याधुनिक तंत्रज्ञान, खासगी क्षेत्राबरोबरचा सहयोग आणि भविष्यातील पथदर्शक आराखडा याबाबतचे सादरीकरण

भारताला भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञानामध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवण्याचे संरक्षण राज्य मंत्र्‍यांनी केले आवाहन

Posted On: 24 JUL 2024 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2024

 

संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी 24 जुलै 2024 रोजी नवी दिल्लीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) भवनाला भेट दिली. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी त्यांच्या पुढे  संस्थेची अलीकडील कामगिरी, हाती घेतलेले मोठे प्रकल्प आणि भविष्यातील पथदर्शक आराखडा, याविषयी तपशीलवार सादरीकरण केले. डीआरडीओने विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सशस्त्र दल आणि विकासाधीन असलेल्या यंत्रणांद्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रणालींबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.

दुहेरी वापर करण्याजोगे तंत्रज्ञान, जेथे मोठ्या प्रमाणातील नवोन्मेष संरक्षण क्षेत्राच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करू शकेल, त्यासह, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, मानवरहित प्रणाली, प्रगत साहित्य, यासारख्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, डीआरडीओ ने खासगी क्षेत्रातील उद्योग, एमएसएमई (सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग) आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांबरोबर केलेल्या सहयोगाबाबातही संरक्षण राज्य मंत्र्‍यांना माहिती देण्यात आली.

तंत्रज्ञान विकास निधी (TDF) योजना, अत्याधुनिक तंत्रज्ञानातील क्षमता वाढवण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरते’ला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने परिसंस्था तयार करण्यासाठी खासगी उद्योगांच्या, विशेषत: स्टार्ट-अप आणि एमएसएमईच्या सहभागाला कशा प्रकारे प्रोत्साहन देत आहे, याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

एखाद्या यंत्रणेच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून उद्योग क्षेत्राला सहभागी करून घेण्यासाठी डीआरडीओचे प्रयत्न, उद्योगांसाठी डीआरडीओ च्या पेटंटची उपलब्धता, आणि उत्कृष्टता केंद्रे, बाह्य संशोधन अनुदान, यासारख्या योजनांच्या माध्यमातून डीआरडीओ उद्योग अकादमीद्वारे शिक्षण तज्ञांना दिले जाणारे पाठबळ याबाबत देखील माहिती देण्यात आली.

आपल्या भाषणात संजय सेठ यांनी, देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची वचनबद्धता आणि समर्पण, याची प्रशंसा केली. डीआरडीओने, भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञानामध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी देशाला सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी डीआरडीओने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.  

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2036525) Visitor Counter : 6


Read this release in: English , Urdu , Hindi