जलशक्ती मंत्रालय
जल जीवन अभियानाने केवळ 5 वर्षांच्या कालावधीत ग्रामीण भागात 3 कोटी पाणी जोडण्यांवरून 15 कोटी पाणी जोडण्यांची सोय करण्याचा ऐतिहासिक टप्पा साध्य केला
देशातील 2.28 लाख गावे आणि 190 जिल्ह्यांनी ‘हर घर जल’ स्थिती प्राप्त केली
पाण्याच्या नमुन्यांची योग्य वेळी तपासणी होणे सुनिश्चित करण्यासाठी 2,163 प्रयोगशाळा कार्यरत; देशातील 24.59 लाखांहून अधिक महिलांना फिल्ड टेस्टिंग किट्सचा वापर करून पाण्याचे नमुने तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात आले
देशभरातील 88.91% शाळा आणि 85.08% अंगणवाड्यांना आता नळाने पाणीपुरवठा होत आहे
या सोनेरी टप्प्याने आपल्या देशवासियांना शुध्द पाण्याची भेट दिलीच आहे पण त्याचसोबत त्यांच्या जीवनाचा दर्जा देखील अनोख्या पद्धतीने सुधारला आहे: केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील
Posted On:
23 JUL 2024 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
देशभरातील 15 कोटी ग्रामीण घरांना नळाने पाणीपुरवठ्याच्या जोडण्यांची व्यवस्था करुन राष्ट्रीय जल जीवन अभियानाने (जेजेएम) आज ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरु करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सरकारी कार्यक्रमाने अभूतपूर्व वेग आणि प्रमाणाचे दर्शन घडवले आहे. केवळ पाच वर्षांच्या कमी काळात या अभियानाने नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या जोडण्यांची संख्या 3 कोटींवरून तब्बल 15 कोटींपर्यंत पोहोचवली आहे.
या प्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी एक्स या समाज माध्यम मंचावर पाठवलेल्या संदेशात हा ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले, “या सोनेरी टप्प्याने आपल्या देशवासियांना शुध्द पाण्याची भेट दिलीच आहे पण त्याचसोबत त्यांच्या जीवनाचा दर्जा देखील अनोख्या पद्धतीने सुधारला आहे.”
देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन तसेच विविध विकासात्मक भागीदारांच्या सहयोगातून जेजेएमने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. आज घडीला गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश ही आठ राज्ये तसेच पुदुचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव तसेच अंदमान आणि निकोबार बेटे या तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के म्हणजे सर्व घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा होत आहे. इतर अनेक राज्ये या संदर्भात चांगली प्रगती करत असून लवकरच त्यांना देखील ‘हर घर जल(एचजीजे)’ दर्जा प्राप्त होईल.बिहार (96.08%), उत्तराखंड (95.02%),लडाख (93.25%) आणि नागालँड (91.58%) या राज्यांनी एचजीजे दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती केली आहे.
याशिवाय 2.28 लाख गावे आणि 190 जिल्ह्यांची नोंद 'हर घर जल' योजनेअंतर्गत झाली आहे तर 100 जिल्हे आणि 1.25 लाखांहून अधिक गावे 'हर घर जल' योजनेअंतर्गत प्रमाणित आहेत. 23 जुलै 2024 पर्यंत 5.24 लाख ग्राम पाणी आणि स्वच्छता समित्या (VWSCs)/पाणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि 5.12 लाख ग्राम कृती आराखडे (VAPs) विकसित करण्यात आले आहेत. या आराखड्यात आवश्यक पाणीपुरवठा योजनेचा प्रकार, खर्चाचा अंदाज, अंमलबजावणीचे वेळापत्रक तसेच कृती आणि देखभालीची व्यवस्था यांचा तपशील आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचे स्रोत आणि पुरवठ्याच्या बिंदूच्या ठिकाणी पाण्याच्या नमुन्यांच्या नियमित, काटेकोर चाचण्या घेतल्या जातात. पाण्याच्या नमुन्याची चाचणी वेळेवर व्हावी यासाठी एकूण 2,163 प्रयोगशाळा आहेत. गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी 24.59 लाखांहून जास्त महिलांना फील्ड टेस्टिंग किट (FTK) वापरून पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे सर्व आर्सेनिक आणि फ्लोराईड प्रभावित वस्त्यांमध्ये आता सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. पिण्यायोग्य पाणी पुरवठ्याची हमी मिळावी आणि हे पाणी कायमस्वरूपी मिळावे यासाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना सातत्याने सर्व उपाययोजना करायचे निर्देश दिले आहेत.
S.Patil/S.Chitnis/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2036122)
Visitor Counter : 88