संरक्षण मंत्रालय
कारगिल विजय दिनाच्या रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त भिसियाना तळावर चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके सादर
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2024 5:34PM by PIB Mumbai
भिसियानाच्या हवाई दलाच्या तळावर कारगिल विजय दिवसाचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांनी देशासाठी गाजवलेला पराक्रम, शौर्य आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी अभिमानाने हा दिवस पाळण्यात आला. हवाई दलाची सफेद सागर मोहीम आणि भारतीय लष्कराची विजय मोहीम यामुळे 1999 च्या कारगिल युद्धात भारताला विजय मिळवता आला. या घटनेला पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने विजयाची जयंती साजरी करण्यात आली. अवकाशात अतिशय उंचावर शत्रूविरूद्ध यशस्वी हवाई मारा करून भारताच्या हवाईदलाने या युद्धात मैलाचा दगड रोवला.
भिसियाना तळावर तैनात असलेल्या मिग 21 च्या 96 प्रकारातील गोल्डन एरो या लढाऊ विमानांचा वापर हवाई दलाच्या 17 व्या तुकडीने कारगिल युद्धातल्या मोहिमांमध्ये सक्रियपणे केला होता. शत्रूच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी या तुकडीने अनेक मोहिमा हाती घेतल्या होत्या. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठित 'बॅटल ऑनर' ने सन्मानित करण्यात आले. सफेद सागर मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल या तुकडीने सर्वाधिक सन्मान आणि पुरस्कार पटकावले आहेत. त्यात स्क्वॅड्रन लीडर अजय आहुजा (मरणोत्तर) यांना मिळालेल्या वीर चक्राचा समावेश आहे.
वेस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी एअर मार्शल पी के व्होरा यांनी आज भिसियाना येथील युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. माजी हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल बी एस धनोआ (निवृत्त), स्क्वॅड्रन लीडर दिवंगत अजय आहुजा यांच्या पत्नी अलका आहुजा, सफेद सागर मोहिमेतील पुरस्कार विजेते आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि त्यांचा सत्कार केला.
आकाश गंगा स्कायडायव्हिंग पथकाद्वारे पॅरा-ड्रॉप, तीन राफेल आणि तीन जग्वार लढाऊ विमानांद्वारे 'विक' फॉर्मेशनमधील फ्लायपास्ट, Mi-17 1V हेलिकॉप्टरद्वारे स्लिदरिंग आणि स्मॉल टीम इन्सर्शन अँड एक्स्ट्रॅक्शन (STIE) आणि Su-30 MKI लढाऊ विमानाद्वारे निम्न स्तरावरील एरोबॅटिक्स’चा समावेश असलेली हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मिग-29 विमानांनी उडवलेल्या “एरो हेड” आणि मिसिंग मॅन फॉर्मेशनमधील फ्लायपास्ट देखील या कार्यक्रमात पाहायला मिळाले. एअर फोर्स बँड आणि एअर वॉरियर ड्रिल टीमने दाखवलेल्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले.
शूरता, अचूकता आणि समर्पण दाखवणाऱ्या या हवाई प्रात्यक्षिकांचा आनंद शाळकरी मुलांसह 5000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी घेतला. त्यामुळे सफेद सागर मोहिमेबद्ल युवा प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटला.
T88S.jpeg)
5LAL.jpeg)
VQ6Z.jpeg)
8Q57.jpeg)


***
M.Pange/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034700)
आगंतुक पटल : 102