श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ’मध्ये मे 2024 या महिन्यात सर्वाधिक 19.50 लाख निव्वळ सदस्यांचा समावेश
Posted On:
20 JUL 2024 5:32PM by PIB Mumbai
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) मे 2024 मध्ये 19.50 लाख निव्वळ सदस्य समाविष्ट झाले आहेत. एप्रिल 2018 मध्ये प्रथम वेतनपट आकडेवारी जारी केल्यापासून एका महिन्यात नोंदवलेली ही सर्वाधिक वाढ आहे. मे 2023 च्या तुलनेत निव्वळ सदस्यांच्या वाढीमध्ये 19.62% ची वाढ झाल्याचे वार्षिक विश्लेषणातून दिसून येते. सदस्य संख्येच्या या वाढीचे श्रेय अनेक घटकांना दिले जाऊ शकते, ज्यात रोजगाराच्या वाढलेल्या संधी, कर्मचाऱ्यांच्या फायद्यांविषयी वाढती जागरूकता आणि ईपीएफओ’च्या उपक्रमांच्या व्याप्तीचा वाढता प्रभाव यांचा समावेश आहे.
मे 2024 मध्ये सुमारे 9.85 लाख नवीन सदस्यांनी नाव नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन सदस्यांच्या संख्येत एप्रिल 2024 च्या तुलनेत 10.96% आणि मागील वर्षी मे 2023 च्या तुलनेत 11.5% वाढ झाली आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या सदस्यांमध्ये 18-25 वयोगटातील सदस्यांची संख्या जास्त आहे, मे 2024 मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी 58.37% इतके सदस्य या वयोगटातील आहेत. यावरून या वयोगटातील बहुतेक व्यक्ती, विशेष करून तरुण आणि प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणारे संघटित आस्थापनांमध्ये सामील होत असल्याचे दिसून येते.
या व्यतिरिक्त, मे 2024 मध्ये 18-25 वर्षे वयोगटातील समाविष्ट सदस्य संख्या, ही पहिली वेतनपट आकडेवारी प्रकाशित झाल्यापासून आजवरची सर्वोच्च संख्या आहे.
सुमारे 14.09 लाख सदस्य ईपीएफओ मधून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा एकदा ईपीएफओ मध्ये सामील झाल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होते. ही आकडेवारी मे 2023 च्या तुलनेत 23.47% ची वार्षिक वाढ दर्शवते.
मे 2024 मध्ये महिन्यादरम्यान समाविष्ट झालेल्या नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.48 लाख महिला सदस्य आहेत. मे 2023 च्या तुलनेत या प्रमाणात वर्षभरात 12.15% ची वाढ झाली आहे. तसेच या महिन्यात निव्वळ महिला सदस्यांची वाढ सुमारे 3.69 लाख इतकी होती, जी मे 2023 च्या तुलनेत 17.24% जास्त आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निव्वळ सदस्यांची वाढ सर्वाधिक झाली आहे. या राज्यांमध्ये निव्वळ सभासदांची संख्या सुमारे 58.24% आहे, त्यात या महिन्यात समाविष्ट 11.36 लाख सदस्यांचा समावेश आहे. महिनाभरात 18.87% निव्वळ सदस्यांच्या वाढीसह महाराष्ट्र सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2034676)
Visitor Counter : 67