दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

परदेशात राखी पाठवण्यास इच्छुकांनी 31 जुलैपर्यंत पाठवण्याचा भारतीय टपाल खात्याचा सल्ला


सीमाशुल्काशी संबंधित अडथळे आणि पोहोचण्यास विलंब होण्याच्या शक्यता टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनावली जारी

Posted On: 19 JUL 2024 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2024

रक्षाबंधनाचा आगामी सण साजरा करण्यासाठी आपल्या परदेशस्थ प्रियजनांना आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमार्फत राखी पाठवण्याचे आवाहन  भारतीय टपाल खात्याने केले आहे. राखी व भेटवस्तूंच्या रुपाने तुम्ही पाठवत असलेल्या तुमच्या हृदयस्थ शुभेच्छा तुमच्या प्रियजनांपर्यंत योग्य वेळेत पोहोचण्यासाठी 31 जुलैपर्यंत त्या टपालात देण्याचा आग्रहाचा सल्ला भारतीय टपाल खात्याने दिला आहे.

आंतरराष्ट्रीय टपाल सेवेतील गुंतागुंतीच्या नियमांमधून विनाविलंब पार पडून, सीमाशुल्काशी संबंधित बाबींमध्ये अडवणूक न होता योग्य वेळेत तुमचे टपाल पोहोचावे यासाठी भारतीय टपाल खात्याने जारी केलेल्या आवश्यक “हे करा आणि हे टाळा” सूचना पुढीलप्रमाणे –

  1. प्रवासादरम्यान खराब होऊ नयेत म्हणून तुमच्या राख्या उत्तम प्रकारे वेष्टनात बांधा.
  2. भेटवस्तूच्या पाकिटावर योग्य लेबल वापरून त्यावर संपूर्ण पत्ता अचूक पिन कोड/टपाल कोड सह सविस्तर लिहा. तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक लिहिल्यास उत्तम.
  3. सीमाशुल्क प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याकरता जाहीर करण्याच्या  अर्जावर तुमच्या पाकिटातील सर्व वस्तूंची अचूक नोंद करा.
  4. बंदी घातलेल्या वस्तू जसे की ज्वलनशील पदार्थ, द्रवरूप किंवा नाशवंत पदार्थ पाठवणे टाळा. हे पदार्थ जप्त केले जाऊ शकतात.

सीमाशुल्क प्रक्रियेतील विलंब टाळून टपालाची वेगवान पोच व्हावी याकरता राखीशी संबंधित वस्तूंकरता दिलेले ‘हार्मोनाइज्ड सिस्टिम’ (एचएस) क्रमांकांचा नोंदीत समावेश करा. बिगर-व्यावसायिक टपालासाठी एचएस क्रमांकांचा वापर बंधनकारक नाही. तरीदेखील एचएस क्रमांकांचा समावेश केल्यास सीमाशुल्क प्रक्रियेत टपाल सुरळीत पुढे जाण्यास त्यामुळे मदत होईल. राखीशी संबंधित काही उत्पादनांकरता असलेले एचएस क्रमांक पुढीलप्रमाणे –

  • राखी रक्षा सूत्र – 63079090
  • इमिटेशन आभूषणे  – 71179090
  • हॅन्ड रिडल्स किंवा  तत्सम वस्तू (राखीसह) – 96040000
  • उकडलेली मिठाई, सारण भरलेली किंवा त्याशिवाय – 17049020
  • टॉफीज्, कॅरॅमेल्स व तत्सम गोड पदार्थ – 17049030
  • शुभेच्छा पत्रे – 49090010

या आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि भारतीय टपाल खात्याची प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सेवा यांच्या सहाय्याने तुमच्या राख्या देशोदेशीच्या सीमा पार करून योग्य वेळेत व सुरक्षितरित्या परदेशांत असलेल्या तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.


N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2034460) Visitor Counter : 16