माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील ‘वॉईसओवर’ कलाकारांच्या कौशल्यवाढीसाठी ‘राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ’ (एनएफडीसी) आणि ‘नेटफ्लिक्स’ यांच्या भागीदारीतून ‘द वॉईसबॉक्स’ उपक्रम

Posted On: 18 JUL 2024 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,18 जुलै 2024

माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणारे सार्वजनिक क्षेत्रातील ‘राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ’ (एनएफडीसी) आणि इंटरनेटच्या माध्यमातून चित्रपट, मालिका इ. प्रदर्शित करणाऱ्या ‘नेटफ्लिक्स इंडिया’ एकत्र येऊन भारतातील ‘वॉईसओवर’ अर्थात पडद्यामागून आवाज देणाऱ्या कलाकारांच्या कौशल्यवाढीसाठी ‘द वॉईसबॉक्स’ हा उपक्रम सुरू करत आहेत.

उपक्रमाच्या घोषणेप्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सचिव संजय जाजू, सह सचिव (चित्रपट) वृंदा देसाई, ‘नेटफ्लिक्स’चे कायदा संचालक आदित्य कुट्टी व स्पर्धात्मक धोरण प्रमुख फ्रेडी सोमेस आणि ‘पर्ल अकॅडेमी’चे अध्यक्ष शरद मेहरा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

‘एनएफडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक व माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील संयुक्त सचिव (प्रसारण II) पृथुल कुमार, ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या व्यवसाय व कायदे व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक व सामान्य सल्लागार किरण देसाई यांनी आज शास्त्री भवन इथे दोन संस्थांच्या भागीदारीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतीय चित्रपट आणि माध्यमे व करमणूक उद्योगातील प्रतिभेची जोपासना  करण्याबाबत  ‘एनएफडीसी’ आणि ‘नेटफ्लिक्स’च्या  संयुक्त दृष्टीकोनाला अनुरूप   हा करार आहे.

‘द वॉईसबॉक्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलुगु आणि गुजराती भाषांमध्ये काम करणाऱ्या वॉईसओवर कलाकारांना आवाज पूर्वप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून अतिथी व्याख्याते व मार्गदर्शनपर सत्रांचा समावेश असलेल्या संरचित कार्यशाळांचे आयोजन व त्यानंतर मूल्यांकन केले जाईल. भारतातील नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई व कोची या सात मोठ्या शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. प्राथमिक फेरीद्वारे 210 जणांची निवड केली जाणार असून त्यातून प्रत्येक तुकडीत 30 प्रशिक्षणार्थी घेतले जातील. किमान 50% प्रशिक्षणार्थी म्हणून महिलांची निवड केली जाणार आहे.

‘पर्ल अकॅडेमी’ ही भारतातील आघाडीची संकल्पना संस्था या कार्यक्रमात प्रशिक्षण भागीदार आहे. ‘नेटफ्लिक्स’चा विशेष कार्यक्रम ‘आजादी की अमृत कहानियाँ’मध्ये सहभागी होण्याची संधी प्रत्येक  तुकडीतून निवडलेल्या सर्वात यशस्वी प्रशिक्षणार्थीला दिली जाणार आहे. या कार्यक्रमात हे निवडक कलाकार भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कथांना आवाज देतील.

हा उपक्रम माध्यमे व करमणूक क्षेत्रात कामाचा दोन वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या व्यावसायिक आवाज कलाकारांसाठी व त्यातही प्राधान्याने महिलांसाठी, जे आपल्या आवाज देण्याच्या कौशल्यांना अधिक झळाळी देण्यास उत्सुक आहेत अशा सर्वांसाठी खुला आहे.

जगभरातील दूरचित्रवाणी आणि चित्रपट उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी आजवर योग्य संधीपासून उपेक्षित राहिलेल्या समुदायांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी’ने ‘द वॉईसबॉक्स’ हा कार्यक्रम प्रायोजित केला असून त्यासाठी प्रति वर्ष 100 दशलक्ष डॉलर्स दराने पाच वर्षांसाठी निधी दिला आहे.

अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी ‘एनएफडीसी’चे संकेतस्थळ आणि अधिकृत समाज माध्यम खात्यांना भेट द्या.


N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2034174) Visitor Counter : 95