वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी टीईपीए मधील निर्धारित ध्येयपूर्तीकरिता काम करण्यासाठी स्विस समकक्षांसोबत साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2024 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्विस समकक्ष फेडरल कौन्सिलर गाय पार्मोलीन यांच्या निमंत्रणावरून स्वित्झर्लंडला अधिकृत भेट दिली.
या अत्यंत यशस्वी आणि फलदायी भेटीदरम्यान, गोयल यांनी द्विपक्षीय शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली आणि मंत्री पार्मोलीन यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. तत्पूर्वी सकाळी दोन्ही मंत्र्यांनी स्विस आणि भारतीय उद्योग धुरिणांसोबत संयुक्त बैठक घेतली.
मंत्री पार्मोलीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान, व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) हा व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एक उत्कृष्ट चौकट प्रदान करत असल्याचे उभय बाजूंनी नमूद केले. सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठीचा केंद्रित दृष्टीकोन टीईपीए अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे/लक्ष्य जलदगतीने साध्य करेल.
15 जुलै रोजी नाश्त्याच्या वेळी झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी प्रख्यात स्विस आणि भारतीय उद्योगपतींसोबत आकर्षक आणि फलदायी चर्चा केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी स्विस कंपन्यांना भारताच्या विकासगाथेचा एक भाग होण्यासाठी आणि त्यांच्या वाढत्या आणि गतिमान बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. भारतीय उद्योग महासंघाने पाठवलेल्या 12 सदस्यीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाला स्विस उद्योजकांसोबत व्यवसाय विस्ताराची संधी होती.
तत्पूर्वी, वाणिज्य मंत्र्यांनी भारतात व्यवसाय आणि गुंतवणूक करण्यास उत्सुक निवडक स्विस उद्योगांच्या अध्यक्ष/सीईओ तसेच भारतीय समुदायातील प्रतिनिधींची भेट घेतली. मंत्र्यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक नगोजी ओकोन्जो –इवेला यांची झ्युरिक येथे भेट घेतली.
10 मार्च, 2024 रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी झालेल्या ऐतिहासिक भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या (टीईपीए) अंमलबजावणीसाठी पुढील टप्यांवर चर्चा करणे आणि करारात नमूद केल्यानुसार 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आणि ईएफटीए देशांद्वारे भारतात 10 लाख नोकऱ्यांची निर्मिती पुढील 15 वर्षांमध्ये करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याचे मार्ग आणि माध्यम ओळखणे ही या भेटीची प्रमुख उद्दिष्टे होती.
पार्श्वभूमी
स्वित्झर्लंड हा आमच्यासाठी महत्त्वाचा व्यापार/गुंतवणूक भागीदार आहे. तो 2023 मधील 21 अब्ज अमेरिकन डॉलरच्या द्विपक्षीय व्यापारासह जागतिक स्तरावर भारताचा 20 वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. एप्रिल 2000 ते मार्च 2024 या कालावधीत सुमारे 10 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या एकत्रित थेट परदेशी गुंतवणुकीसह भारतातील 12 वा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. भारतात 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत ज्यांनी भारतात 1,66,000 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यापैकी बऱ्याच कंपन्यांच्या उत्पादन सुविधा आणि संशोधन आणि विकास केंद्रे भारतात आहेत.
उचित वेळी झालेल्या या भेटीमुळे उभय पक्षांना टीईपीए द्वारे प्रतिबद्धता अधिक सखोल आणि वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करून परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांचा आढावा घेण्यास अनुमती मिळाली.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2033767)
आगंतुक पटल : 84